odi world cup 2023 : भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय बांगर यांनी आगामी वन डे विश्वचषकासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. कोणते अकरा शिलेदार मोठ्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणार याबाबत बोलताना त्यांनी लोकेश राहुलला संघातून वगळले. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार असून कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ तारखेला आमनेसामने असतील. भारताचा या स्पर्धेतील सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आगामी मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जाणकारांसह माजी क्रिकेटपटू आपापली मतं मांडत आहेत.
दरम्यान, २०२३ च्या विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. चेन्नई येथे ही लढत होत असल्याने तिथे फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असल्याचे बांगर यांनी सांगितले. "विकेट कशी राहते हे खूप महत्त्वाचे आहे. चेन्नईची विकेट वेगळी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संघाला चार वेगवान गोलंदाजांची गरज भासणार नाही. हार्दिक पांड्या प्रभावी गोलंदाजी करू शकतो. या कारणास्तव मी अक्षर पटेलला माझ्या संघात आठव्या क्रमांकावर ठेवले आहे. मला वाटत नाही की संपूर्ण विश्वचषकादरम्यान भारतीय संघ आपल्या टॉप-७ मध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करू इच्छित असेल", असे बांगर यांनी आणखी सांगितले.
संजय बांगर यांनी निवडली प्लेइंग XI रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू