नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांना बीसीसीआयच्या समालोचन पॅनलमधून वगळण्याचे कारण नागरिकता संशोधन कायद्याला (सीएए) विरोध आणि जेएनयूचे समर्थन असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समालोचन कक्षाचा नियमित सदस्य राहिलेले मांजरेकर आयपीएलच्या १३ व्या पर्वाच्या समालोचन पॅनलमधून बाहेर होऊ शकतात.बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मांजरेकर यांना समालोचन पॅनलमधून बाहेर करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मांजरेकर गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय लढतीच्या वेळी धर्मशाळामध्ये नव्हते. ही लढत पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाली होती. एका वृत्तानुसार बीसीसीआय पॅनलचे अन्य समालोचक सुनील गावसकर, एल. शिवरामाकृष्णन व मुरली कार्तिक या लढतीदरम्यान उपस्थित होते.दरम्यान, मांजरेकर यांना पॅनलमधून वगळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या वृत्तानुसार बोर्ड त्यांच्या कामावर खूश नव्हते. पण वृत्तसंस्थेनुसार सीएएविरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या रॅलीचे त्यांनी समर्थन केले होते. त्यांनी जेएनयूमध्ये झालेल्या हाणामारीचा विरोध केला होता. मांजरेकर यांनी अनेकदा सीएएचा सार्वजनिक विरोध केलेला आहे. सीएएविरुद्धच्या रॅलीसाठी मांजरेकर यांनी ७ जानेवारी २०२० ला टिष्ट्वट केले होते की, ‘वेल डन मुंबई.’ (वृत्तसंस्था)‘बीसीसीआयच्या निर्णयाचा आदर’‘समालोचनाला मी सन्मान समजत आलो आहे आणि व्यावसायिक असल्यामुळे मी बीसीसीआयच्या निर्णयाचा स्वीकार करतो,’ अशी प्रतिक्रिया संजय मांजरेकर यांनी रविवारी दिली. मांजरेकर यांनी टिष्ट्वट केले,‘मी नेहमीच समालोचनाला सन्मान मानले आहे, पण आता मी स्वत:ला याचे हकदार मानले नाही.’ मांजरेकर पुढे म्हणाले,‘माझी या कामासाठी निवड करायची किंवा नाही हा बोर्डाचा निर्णय आहे, पण मी नेहमीच याचा आदर करील. कदाचित अलीकडच्या कालावधीत बीसीसीआय माझ्या कामावर खूश नव्हते. व्यावसायिक म्हणून मी याचा स्वीकार करतो.’मांजरेकर यांनी भारतातर्फे ३७ कसोटी व ७४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी विश्वकप स्पर्धेदरम्यान त्यांनी रवींद्र जडेजावर टीका केली होती. सौराष्ट्रच्या या अष्टपैलू खेळाडूला हे आवडले नाही आणि त्याने मांजरेकर यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मांजरेकर यांनी जडेजाविरुद्ध चुकीचे वक्तव्य केल्याची कबुली दिली होती. मांजरेकर यांनी ‘पिंक कसोटी’दरम्यान सहकारी समालोचक हर्षा भोगले यांच्या क्षमतेवरही प्रश्न उपस्थित केला होता. कारण भोगले हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. त्यानंतर मांजरेकर यांना माफीही मागावी लागली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सीएएचा विरोध करणे मांजरेकरला पडले महागात, बीसीसीआय समालोचन पॅनलमधून बाहेरचा रस्ता
सीएएचा विरोध करणे मांजरेकरला पडले महागात, बीसीसीआय समालोचन पॅनलमधून बाहेरचा रस्ता
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने मांजरेकर यांना समालोचन पॅनलमधून बाहेर करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मांजरेकर गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय लढतीच्या वेळी धर्मशाळामध्ये नव्हते.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:16 AM