Virat Kohli's resignation from Test captaincy - भारतीय क्रिकेटविश्वाला शनिवारचा दिवस हा धक्का देणारा ठरला. भारताचा कसोटी संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला. २४ तासाआधी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विराटच्या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. विराटच्या या निर्णयावर माजी फलंदाज संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांनी धक्कादायक विधान केलं.
विराट कोहलीनं ट्विट करून माहिती दिली. तो म्हणाला,''एवढा प्रदीर्घ काळ मला संघाचे नेतृत्व सांभाळण्याची संधी दिल्याबद्दल मी BCCIचे आभार मानू इच्छितो. या जबाबदारीच्या पहिल्या दिवसापासून मी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं, ते पूर्ण करण्यासाठी संघातील प्रत्येक सहकाऱ्यांनी योगदान दिले आणि कोणत्याही कठीण प्रसंगी ते डगमगले नाही. तुमच्यामुळे हा प्रवास सुंदर आणि अविस्मरणीय झाला. रवी भाई आणि संपूर्ण यंत्रणा या यशामागचं इंजिन होते. अखेरचं पण, महेंद्रसिंग धोनीचे मनापासून आभार, त्यानं कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा विश्वास त्यानं दाखवला.''
विराट कोहलीला संकटात दिसत होते कर्णधारपद - संजय मांजरेकर
संजय मांजरेकर म्हणाले,''पाच महिन्यांच्या कालावधीत त्यानं आयपीएल संघाचे कर्णधारपद आणि ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. त्याचे हा निर्णय हैराण करणारा होता. त्यानं भारतीय संघाच्या तीनही फॉरमॅटमधील महत्त्वाची पद पटापट सोडली. विराट कोहली कस ही करून कर्णधारपद टिकवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याला हटवलं जाऊ नये. पण, जेव्हा त्याला वाटलं की कर्णधारपद संकटात आहे, तेव्हा तो ते सोडून देतो.''
त्यांनी पुढे म्हटलं की,''जेव्हा अनिल कुंबळे प्रशिक्षक होते, तेव्हा कोहली अस्वस्थ होता आणि पुन्हा एकदा रवी शास्त्री आल्यानंतर तो स्थिर झाला. नवीन प्रशिक्षक ( राहुल द्रविड) शास्त्रींसारखा नाही आहे. त्यामुळे त्याला आता कसं समर्थम मिळणार आहे, याचा अंदाज त्याला आला असेल. त्यामुळे त्याचा हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला आहे, हे कुणालाही दिसेल.''