T20 World Cup 2024 : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागत नव्हता. पण, विराट कोहली आणि अक्षर पटेल याला अपवाद ठरले. दोघांनीही सावध आणि संयमी खेळी करून सन्मानजनक धावसंख्या उभारली. मात्र, भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी करून तमाम भारतीयांची धाकधुक वाढवली. अंतिम सामन्यात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावा केल्या. यासाठी विराटला ५९ चेंडूंचा सामना करावा लागला.
भारताने निर्धारित २० षटकांत १७७ धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने सांघिक कामगिरी केली. कधीकाळी ३० चेंडूत ३० धावांची आवश्यकता असलेल्या आफ्रिकेला अखेरच्या षटकात १६ धावा करायच्या होत्या. पण, दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. याचाच दाखला देत माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी एक मोठे विधान केले.
मांजरेकरांचे रोखठोक मत ESPN Cricinfo शी बोलताना मांजरेकर म्हणाले की, ९० टक्के दक्षिण आफ्रिका जिंकेल असे वाटत होते. पण, गोलंदाजांनी कमाल केली. विराटने मोठी खेळी केली पण त्याचा स्ट्राईक रेट केवळ १२८ असा होता. भारताने विश्वचषक जिंकला म्हणूनच विराटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले असे मला वाटते. विराटने खूपच संथ खेळी केली त्यामुळे मला वाटते की गोलंदाजांमुळे तो वाचला.
दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला.