दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाचे मालक पार्थ जिंदाल ( Parth Jindal) यांनी रिषभ पंतला ( Rishabh Pant) ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाच्या अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळावी अशी विनंती केली आहे. रिषब पंत हा देशातील सर्वोत्तम यष्टिरक्षक-फलंदाज असल्याचा दावाही त्यांनी केला. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात पंतला बाकावर बसवल्यानंतर जिंदाल यांनी हे मत मांडले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभ वगळता आतापर्यंत प्रत्येकाला किमान एकदा अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. मागील एक वर्षांत रिषभची कामगिरी फार चांगली झालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात त्याला वन डे व ट्वेंटी-20 संघातून वगळण्यात आले, परंतु कसोटी संघात त्याला कायम ठेवण्यात आले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रिषभनं इंग्लंड व ऑस्ट्रेलियात शतकी खेळी केली आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेपूर्वी सराव सामन्यात त्याचे खेळणे अपेक्षित होते. पण, संघ व्यवस्थापनानं वृद्धीमान सहाला प्राधान्य दिले, परंतु सहा सराव सामन्यात शून्यावर माघारी परतला.
त्यामुळे जिंदाल यांनी ट्विट करून रिषभला संधी मिळायला हवी, यासाठी बॅटिंग केली. जिंदाल यांनी या ट्विटमध्ये संजू सॅमसनच्या निराशाजनक कामगिरीबाबत भाष्य केले. ते म्हणाले,''माझ्यामते संजू सॅमसनला चांगली कामगिरी करता आलेली नाही आणि वृद्धीमान सहा शून्यावर बाद झाला आहे. याचा अर्थ रिषभ पंतही धावा करू शकणार नाही, असा अर्थ होत नाही? रिषभ हा भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक- फलंदाज आहे. त्यात तो डावखुरा असल्यानं पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो फिट आहे.''
दरम्यान, ११ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात रिषभला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
सराव सामने
६-८ डिसेंबर - भारत ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए , वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
११-१३ डिसेंबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, वेळ - सकाळी ९ वाजल्यापासून
कसोटी मालिका
१७-२१ डिसेंबर - अॅडलेड ओव्हल, वेळ - सकाळी ९.३० वाजल्यापासून
२६ ते ३० डिसेंबर - मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
७-११ जानेवारी २०२१- सिडनी क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
१५-१९ जानेवारी २०२१ - ब्रिस्बेन क्रिकेट ग्राऊंड, वेळ - पहाटे ५ वाजल्यापासून
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ - डेव्हिड वॉर्नर, जो बर्न्स, विल पुकोव्हस्की, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टीम पेन ( कर्णधार व यष्टिरक्षक), कॅमेरून ग्रीन, सीन अबॉट, मिचेल नेसेर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स पॅटिन्सन, नॅथन लियॉन, मिचे स्वेप्सन.
Web Title: ‘Sanju Not Doing Enough…’: DC Owner Calls Rishabh Pant Best Wicketkeeper In Country, Urges India to Give Him A Chance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.