कोलंबो : टीम इंडियाचे मुख्य कोच गौतम गंभीर यांच्यापुढे श्रीलंकेविरुद्ध शनिवारी सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या ‘टी-२०’ मालिकेसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाची निवड करायची, हे अवघड आव्हान असेल. या प्रकारातून निवृत्ती घेणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता ‘टी-२०’ विश्वचषक विजेत्या संघातील सर्वच खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर आले आहेत. अशातच पंत-सॅमसन यांच्यापैकी एकाची निवड करणे सोपे असणार नाही. दोघेही आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज आहेत.
या दोघांपैकी एकाला फलंदाज म्हणून खेळविणेदेखील जोखमीचे असेल. पंतने विश्वचषकात १७१ धावा केल्या, तर संजूला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार म्हणून सूर्या आणि प्रशिक्षक म्हणून गंभीर यांची ही पहिली मालिका असेल. गंभीर यांचा आधीचा अनुभव पाहता ते संघ संयोजनाला महत्त्व देतील हे निश्चित. दोघांपैकी कुणाला प्राधान्य द्यावे, हा पूर्णपणे व्यवस्थापनाचा निर्णय असेल.
रोहित शर्माने विश्वचषकादरम्यान पंतला झुकते माप दिले होते. दुसरीकडे, सॅमसनचा एकाही सामन्यासाठी विचार झाला नव्हता. पंत कार अपघातात जखमी झाल्यानंतर यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून ईशान किशन, सॅमसन, जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांना संधी देण्यात आली. सॅमसनने २८ टी-२० सामन्यांत १३३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यापैकी २७ सामने त्याने २०२० नंतर खेळले. तसे या प्रकारात त्याने २०१५ ला पदार्पण केले होते. ऋषभ पंतने ७४ सामन्यांत १२७ च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या.