नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत झालेल्या दारुण पराभवानंतर बीसीसीआयने आशिया चषकासाठी संघ निवड करण्याआधी सावध पवित्रा घेतला आहे. रविवारी संघाची निवड होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या मते संघ निवडीत यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन याची वर्णी लागणार नाही. संजूने दोन वन डेत ९ आणि ५१ धावा केल्यानंतर तीन टी-२० सामन्यात १२, ७ आणि १३ धावा असा 'फ्लॉप शो' केला होता. आशिया चषकषाला मुल्तान येथे ३० ऑगस्ट रोजी सुरुवात होईल, भारताला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेत खेळायचा आहे. सध्या तरी निवडकर्ते आशिया चषकासाठीच १५ सदस्यांचा संघ निवडतील. विश्वचषकाच्या संघाची निवड नंतर केली जाईल, असे या सूत्रांचे मत आहे.
या संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची थोडीफार कल्पना येईल. श्रेयस अय्यर फिट झाला आहे की नाही हेदेखील संघ घोषित झाल्यानंतर समोर येईल. तो पाठीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएमध्ये घाम गाळतोय. श्रेयस अय्यर हा आशिया कप खेळण्याची शक्यता धूसर आहे. भारतासाठी हा मोठा धक्का असेल. वनडे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा मोठा प्रश्न संघासमोर असणार आहे. अय्यरच्या अनुपस्थितीत संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमारला चौथ्या क्रमांकासाठी आजमावून पाहिले होते.
अय्यर फीट नसेल तर चौथ्या क्रमांकावर कोण?
रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळविण्याचा सल्ला दिला आहे, विराट कोहलीने ५५.२१च्या सरासरीने १७६७ धावा केल्या आहेत. विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला तर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्यामुळे फलंदाजीत स्थिरता येईल. समीकरण बसवायचे झाल्यास शुभमन गिल आणि इशान किशन यांना सलामीला पाठवायला हवे. राहुल पूर्णपणे फीट असेल तर इशान किशनला संघात स्थान मिळणार नाही. अशा परिस्थितीत भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव हा एकमेव पर्याय उपलब्ध राहतो. तिलक वर्मानेदेखील गुणवत्ता आणि सातत्याने धावा करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ५७ च्या सरासरीने १६७ धावा केल्या आहेत. मात्र ज्या खेळाडूला वनडे क्रिकेटचा अनुभव नाही अशा तिलकला संधी देणार का हा मोठा प्रश्न उपस्थित होतो.