IPL 2024 मध्ये संजू सॅमसन ( Sanju Samson) हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय... त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने ८ पैकी ७ सामने जिंकून १४ गुणांसह तालिकेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे आणि प्ले ऑफच्या दिशेने त्यांनी मजबूत पाऊल टाकले आहे. संजूने पहिल्यांचाद नेतृत्वकौशल्याची झलक दाखलेली नाही, याआधीही तो राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफपर्यंत घेऊन गेला होता. यावेळी त्याने फलंदाजी व यष्टींमागेही कमालीची कामगिरी करताना निवड समितीची डोकेदुखी वाढवली आहे. आयपीएलनंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप व्हायची आहे आणि त्यामुळेच संजूचा फॉर्म हा इतरांचं टेंशन वाढवणारा ठरू शकतो.
त्यात रोहित शर्मानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व संजू सॅमसनकडे सोपवावे आणि त्यासाठी त्याला रोहितच्या मार्गदर्शनाखाली तयार करावे, अशी मागणी भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग याने केली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघ निवडीत यष्टिरक्षक-फलंदाजाच्या शर्यतीत रिषभ पंत, लोकेश राहुल, इशान किशन, संजू सॅमसन व दिनेश कार्तिक ही नावे चर्चेत आहेत. पण, हरभजनच्या मते RR चा कर्णधार या शर्यतीत खूप पुढे आहे.
काल मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत संजूनेही महत्त्वाची खेळी केली. त्यामुळेच भज्जीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीच्या संघात संजूचे नाव सुचवले आहे, शिवाय त्याने भविष्याचा कर्णधार म्हणून संजूला पसंती दिली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सांभाळले होते आणि तो सध्या उप कर्णधार आहे. भज्जी म्हणाला,''क्लास इज पर्मानंट, फॉर्म इज टेम्पररी; हे यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीने सिद्ध केले आणि जेव्हा यष्टिरक्षक-फलंदाजाची चर्चा होते, तेव्हा संजू सॅमसन हे नाव भारतीय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात असायलाच हवे. शिवाय रोहितनंतर ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून त्याला घडवले गेले पाहिजे... कोई शक??''