Sanju Samson Fined, IPL 2024 RR vs GT: राजस्थान संघाने सलग चार सामने जिंकल्यानंतर यंदाच्या हंगामात त्यांच्या वाट्याला बुधवारी पहिल्या पराभवाचे दु:ख आले. गुजरात टायटन्सने बुधवारी IPL 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सवर तीन गडी राखून रोमांचकारी विजय मिळवला. 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या 5 षटकांत शेवटच्या 30 चेंडूत 73 धावा करत शानदार पुनरागमन केले. पराभवानंतरही रॉयल्सने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. एकीकडे पराभवाचे दु:ख तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट बोर्डाने कारवाई करत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला दंड ठोठावला.
राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला टायटन्सविरुद्ध त्याच्या संघाने संथ ओव्हर रेट ठेवल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने म्हटले आहे की, 'आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा सीझनमधील पहिला गुन्हा होता, जो किमान ओव्हर रेट (स्लो ओव्हर रेट) गुन्ह्यांशी संबंधित होता, त्यामुळे सॅमसनला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.' सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. अष्टपैलू रशीद खानने चमकदार कामगिरी करून टायटन्सला हंगामातील तिसरा विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर रशीदने चौकार लगावला आणि सामना जिंकवला.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे संथ सुरुवात करूनही राजस्थानने आरआरने दमदार फलंदाजी केली. सॅमसनने अवघ्या 38 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या तर रियान परागनेही 48 चेंडूत 76 धावांची शानदार खेळी करत राजस्थान रॉयल्सला 3 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा करून दिल्या. गुजरात संघाकडून शुभमन गिलने 44 चेंडूत 72 धावांची शानदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. त्यानंतर राहुल तेवतिया (11 चेंडूत 22) आणि रशीद खान (11 चेंडूत नाबाद 24) यांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.