टीम इंडियाचा विकेट किपर बॅटर संजू सॅमसन सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये दिसतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विक्रमी शतकाचा त्याला आयसीसी टी-२० क्रमवारीतही मोठा फायदा झाला आहे. बॅक टू बॅक शतकासह खास विक्रमाला गवसणी घातल्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनच्या पदरी भोपळा आला होता. पण सातत्यपूर्ण दमदार कामगिरीचं फळं त्याला मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदनं जाहीर केलेल्या टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने मोठी झेप घेतलीये.
टी-२० तील फलंदाजांच्या क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहचला संजू
दक्षिण आफ्रिकेतील डरबनच्या मैदानात शतकी खेळी करून संजू सॅमसन हा टी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. आता या खेळीचा त्याला रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. टी-२० तील फलंदाजांच्या क्रमवारीत २७ स्थानांनी मोठी झेप घेत संजू सॅमसन आता ३९ व्या स्थानावर पोहचला आहे.
रोहित शर्मासहविराट कोहलीला केलं ओव्हरटेक
संजू सॅमसन याने टी-२० क्रमवारीत भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना मागे टाकले आहे. त्याच्या खात्यात ५३७ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. रोहित आणि विराट या दोघांनी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. टी-२० तील फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा ५८ व्या तर विराट कोहली हा ६४ व्या स्थानी आहे.
ट्रॅविस हेड अव्वल; टी-२० संघाचा कॅप्टन सूर्या घाट्यात!
टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियन ट्रॅविस हेड ८८१ रेटिंग पॉइंट्ससह अव्वलस्थानी आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट एका स्थानातील सुधारणेसह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला एका स्थानाचा घाटा झाला आहे. तो ८०३ रेटिंग पॉइंट्ससह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यात धमाकेदार खेळ दाखवण्यात अपयश आले होते. त्याच्याशिवाय यशस्वी जैस्वाल हा सातव्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.
Web Title: Sanju Samson goes past Rohit Sharma and Virat Kohli's T20I rankings with century in Durban
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.