ms dhoni ipl । नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. राजस्थान रॉयल्सचा (rajasthan royals) संघ ८ गुणांसह गुणतालिकेत आताच्या घडीला अव्वल स्थानावर आहे. अशातच संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला आयपीएलमधील सर्वात आवडता कर्णधार म्हणून संबोधले आहे. तसेच संजू सॅमसन म्हणजे दुसरा महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) असल्याचे चहलने म्हटले आहे. संजू सॅमसन धोनीसारखा शांत आणि सयंमी आहे. त्याच्यामुळेच माझ्या गोलंदाजीत खूप सुधारणा झाली आहे असून याचे सर्व श्रेय संजूला जाते, असे चहलने सांगितले.
खरं तर युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला आहे. युझवेंद्र चहलने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत संजू सॅमसनची तुलना महेंद्रसिंग धोनीसोबत केली. चहलने सांगितले, "जर आयपीएलमधील माझा सर्वात आवडता कर्णधार कोण असेल तर तो निश्चितच संजू सॅमसन आहे, कारण त्याच्यात मला माही भाईची झलक दिसते. तो शांत आणि सयंमी आहे. माझ्या गोलंदाजीत मागील एक वर्षापासून १० टक्के सुधारणा झाली आहे, त्याचे श्रेय सॅमसनलाच जाते. संजू मला एकदम माही भाईसारखे स्वातंत्र्य देत असतो. तो सांगतो की तू ४ षटकांची गोलंदाजी एकदम मोकळ्यापणाने कर."
माही भाईने माझं अन् कुलदीपचं करिअर बनवलं - चहलतसेच महेंद्रसिंग धोनीने माझे आणि कुलदीप यादवचे करिअर बनवले असल्याचे चहलने म्हटले आहे. आमचे करिअर बनवण्यात माही भाईचा मोठा हात आहे. कुलदीप आणि माझे करिअर बनवण्यात माही भाईने ५० टक्के मदत केली. कारण मैदानात तोच सांगायचा की कशी गोलंदाजी करायची आणि कोणता चेंडू टाकायचा आहे, असे चहलने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
चहलने आणखी सांगितले की, "मी आतापर्यंत भारतीय संघासाठी तीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो आहे, ज्यामध्ये माही भाई, विराट भाई आणि रोहित भाई यांचा समावेश आहे. मला तिघांनी देखील खूप मदत केली. माही भाई तर करिअरशिवाय वैयक्तिक जीवनातील देखील काही बाबींसाठी सल्ला देत असतो. लक्षणीय बाब म्हणजे मला तिन्ही कर्णधारांनी सांभाळून घेतले आणि स्वातंत्र्य दिले त्यामुळे ते तिघेही माझे फेव्हरेट आहेत असे चहलने अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"