वृद्धीमान साहाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे रिषभ पंतचे कसोटी संघातील स्थान धोक्यात आलेले असताना मर्यादित षटकांच्या संघातही त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. केरळचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने शनिवारी विजय हजारे चषक वन डे क्रिकेट स्पर्धेत द्विशतकी खेळी करताना पंतच्या स्थानाला धक्का देण्याचे संकेत दिले आहेत. केरळच्या फंलदाजानं एलिट गट 'अ' मधील सामन्यात गोवा संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला.
संजूनं 125 चेंडूंत द्विशतक झळकावलं. त्यानं 129 चेंडूंत 21 चौकार व 10 षटकारांसह नाबाद 212 धावा चोपल्या आणि संघाला 3 बाद 377 धावांपर्यंत मजल मारून दिली. लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा संजू हा आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाच द्विशतकं ही वन डे क्रिकेटमध्ये झळकावली आहेत, त्यातील तीन ही रोहित शर्माच्या नावावर आहेत, तर उर्वरित दोन सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहेत. शिखर धवनने 2013मध्ये भारत A संघाचे प्रतिनिधित्व करतान दक्षिण आफ्रिका A संघाविरुद्ध 248 धावा केल्या आणि कर्ण वीर कौशलने विजय हजारे चषक स्पर्धेत उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करताना सिक्कीमविरुद्ध 202 धावा केल्या होत्या. विजय हजारे चषक स्पर्धेतील हे पहिले द्विशतक ठरले होते.
द्विशतकी खेळीसह संजूनं तिसऱ्या विकेटसाठी सचिन बेबीसह ( 127) 338 धावांची भागीदारी केली. सचिननं 135 चेंडूंत 127 धावा केल्या. लिस्ट A क्रिकेटमधील ही तिसऱ्या विकेटसाठीची तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रिवडा ( 331) यांच्या नावावर होता. संजूनं द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांत चौथे स्थान पटकावले. त्यानं रोहितचा 209 धावांचा विक्रम मोडला.
संजूच्या द्विशतकाचे हायलाईट्स- लिस्ट A क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकानं केलेली सर्वोत्तम कामगिरी; यापूर्वी हा विक्रम आबिद अलीच्या ( 209*) नावावर होता- विजय हजारे चषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी, यापूर्वी केव्ही कौशलने 202 धावा केल्या होत्या.- लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात जलद ( 125 चेंडू) 200 धावा करणारा भारतीय - लिस्ट A क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर येताना द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय - लिस्ट A क्रिकेटमध्ये पहिलेच शतक झळकावत सर्वोत्तम कामगिरी