Join us  

मी पुढे जात राहणार...! भारतीय संघात स्थान न मिळालेल्या संजू सॅमसनची दुसरी भावनिक पोस्ट 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १० सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 5:14 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १० सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया चषक २०२३ स्पर्धा जिंकली आणि आता ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पण, या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत रोहितसह विराट कोहली, हार्दिक पांड्या व कुलदीप यादव यांना विश्रांती दिली गेली आहे. पुन्हा एकदा भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनला मोठ्या स्पर्धेसाठी संघात संधी मिळाली नाही. 

संघाच्या घोषणेनंतर लगेचच, सॅमसनच्या चाहत्यांनी लगेच आपली निराशा व्यक्त केली. आज संजूने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले की,“जे आहे ते आहे!! मी पुढे जात राहणे निवडतो.” 

वेस्ट इंडिजविरुद्ध १ ऑगस्ट २०२३ झालेल्या शेवटच्या वन डे सामन्यात संजूने अर्धशतक झळकावले होते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघात तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि त्याने ४ षटकार आणि २ चौकार मारून ४१ चेंडूंत ५१ धावा केल्या होत्या. सॅमसनने १२ वन डे डावात ५५.७१ च्या सरासरीने तीन अर्धशतकांसह ३९० धावा केल्या आहेत. 

सॅमसन भारताच्या आशियाई क्रीडा २०२३ च्या संघाचा भाग नाही. भारताच्या आशियाई क्रीडा २०२३ संघाचा कर्णधार असलेल्या ऋतुराज गायकवाडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला होता. तसेच, संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवचा पाठींबा कायम ठेवला आहे, ज्याने वन डे क्रिकेटमध्ये फार चांगली कामगिरी केलेली नाही.  

वेस्ट इंडिज दौऱ्यावरही तो अपयशी ठरला आणि त्याला आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. पण तिथेही सूर्या २६ धावा करू शकला.  त्याने २५ इनिंग्जमध्ये २४.४०च्या सरासरीने ५३७ धावा केल्या आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याने शेवटचे अर्धशतक झळकावले होते.  

 

टॅग्स :संजू सॅमसनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया