Join us  

कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!

विक्रमी शतकानंतर संजू सॅमसन यानं शेअर केली कॅप्टन सूर्यकुमार यादवसंदर्भातील खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2024 2:35 AM

Open in App

डरबनच्या मैदानात रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन याने विक्रमी शतक झळकावले. कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या फास्टर सेंच्युरीचा विक्रम मोडित काढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जलद शतक झळकवणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने फक्त ४७ चेंडूत शतक साजरे केले. 

जे विराट-रोहितलाही नाही जमलं ते संजूनं करून दाखवलं एवढेच नाही तर विराट, रोहितला जे जमलं नाही ते या पठ्ठयानं आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये करून दाखवलं. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत हैदराबादच्या मैदानात त्याने शतकी खेळी साकारली होती. त्या खेळीनंतर डरबनच्या मैदानात त्याच्या भात्यातून सलग दुसरं शतक आल्याचे पाहायला मिळाले. या खेळीसह तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

९ वर्षांपूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण, पण आतापर्यंत फक्त ३४ सामन्यात मिळाली संधी

त्यानंतर वनडे पदार्पणासाठी त्याला २०२१ पर्यंत वाट पाहावी लागली. नऊ वर्षांपूर्वी टी-२० च्या मैदानात पदार्पण केले असले तरी त्याला आतापर्यंत फक्त ३४ टी-२० सामने आणि १६ वनडे सामन्यात भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. संजू हा असा खेळाडू आहे ज्याला संघात घ्यावे यासाठी नेटकरी सोशल मीडियावर बॅटिंग करताना पाहायला मिळाले आहे. सातत्यपूर्ण खेळवण्याची ग्वाही मिळाली अन् संजू चमकला. ही गोष्ट आम्ही नाही तर खुद्द संजू सॅमसन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विक्रमी शतकानंतर बोलून दाखवली आहे.

काय म्हणाला संजू?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डरबन येथील टी-२० सामन्यानंतर संजू सॅमसनला नव्या अप्रोचबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर संजू म्हणाला की, नेहमीचच रुटीन चालू असते. यावेळी त्याने नव्या कॅप्टनचा खास उल्लेख केला. सूर्यकुमार यादवनं पुढच्या सात सामन्यात मी तुझ्यासोबत आहे असं सांगत डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी दिली. आतापर्यंतच्या कारकिर्दीत असा स्पष्ट संदेश मला पहिल्यांदाच मिळाला. ही संधी सोडायची नाही या उद्देशानंच मैदानात उतरलो. पुढे अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न राहीन,अशा आशयाच्या शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. सूर्यानं विश्वास दाखवला अन् त्याने दिलेल्या शब्दामुळं संजू चमकला असा सीन इथं पाहायला मिळतोय.  बांगलादेश विरुद्धच्या घरच्या मैदानातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसह दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील ४ सामन्यात संजूला सलामीला संधी मिळणार, हे सूर्यानं स्पष्ट केले होते. जबाबदारी एकदम स्पष्ट असल्यामुळे संजूच्या भात्यातून दमदार खेळी पाहायला मिळत आहे. सातत्य कायम ठेवून तो अधिकाधिक या संधीचा फायदा उठवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघसंजू सॅमसनसूर्यकुमार अशोक यादवद. आफ्रिकाटी-20 क्रिकेट