India vs Sri Lanka, 2nd T20I : श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सीरिजमध्ये भारतीय संघाची सुरुवात विजयानं झाली. पण दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा खेळाडू संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. सॅमसनच्या जागी आता आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी केलेल्या जितेश शर्मा याला संधी देण्यात आली आहे.
संजू सॅमसन उर्वरित ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी खेळू शकणार नसल्याच्या वृत्ताला आता बीसीसीआयनेही दुजोरा दिला आहे. मंगळवारी, 3 जानेवारी रोजी मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील सलामीच्या सामन्यात गुडघ्याच्या दुखापतीमुळे संजू सॅमसनला उरलेल्या टी-२० सामन्यांना मुकावे लागणार आहे. सॅमसन उर्वरित संघासोबत पुण्याला गेला नाही. गुरुवारी पुण्यात दुसरा T20 सामना खेळवला जाणार आहे.
संजू सॅमसनच्या गुडघ्याला सूज आली आहे आणि तो पुढील चाचणीसाठी मुंबईतच आहे. थर्ड-मॅन रीजनमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना सॅमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने आज दुपारी त्याला स्कॅन आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत नेलं होतं. यात वैद्यकीय सल्ल्यानुसार सॅमसन विश्रांती घेणार आहे.