sapna gill instagram model । मुंबई: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉबरोबर केलेल्या कथित गैरवर्तन आणि त्याच्या कारवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केल्याप्रकरणी सपना गिल आणि इतर तीन आरोपींनी सोमवारी मुंबईतील एका स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला. जामिनावर बाहेर येताच सपना हिने पृथ्वी शॉच्या अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. तिने पोलिसांकडे पृथ्वी शॉविरोधात दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशातच आता मॉडेल सपना गिलने आरोपांची मालिका सुरू करून पृथ्वी शॉच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे.
दरम्यान, मंगळवारी सेल्फी वादात भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. सपना गिलचे वकील अली काशिफ देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. पृथ्वीशिवाय आशिष सुरेंद्र यादव, ब्रिजेश आणि इतरांविरुद्ध सपना गिलसोबत विनयभंग केल्याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सपना गिलचे वकील अली काशिफ देशमुख यांनी सांगितले की, पृथ्वी शॉ आणि इतरांवर कलम 34, 120बी, 144, 146, 148, 149, 323, 324, 351, 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर सपना गिलला सोमवारी सेल्फी विवाद प्रकरणात जामीन मिळाला होता. गिलसह अन्य तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. मागील आठवड्यात पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून मुंबईत वाद झाला होता. यादरम्यान सपना गिलचा पृथ्वी शॉसोबत वाद झाला. तसेच त्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
4 जणांना झाली होती अटक
याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सपना गिलसह चौघांना अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, आरोपींच्या चार दिवसांच्या कोठडीसाठी पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर गिल, तिचा मित्र शोभित ठाकूर आणि अन्य दोन रुद्र सोलंकी आणि साहिल सिंग यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर सपना गिल आणि इतर आरोपींनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. सोमवारी अंधेरी न्यायालयाच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.
सपना गिलने केले गंभीर आरोप
आम्ही पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांना विमानतळावर थांबवण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी आणि त्याच्या मित्राने जमावाला बोलावून पळण्याचा प्रयत्न केला. ते आक्रमक आणि मद्यधुंद होते. त्यांनी आमची माफी देखील मागितली. पण 16 फेब्रुवारीला मला कळले की माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, म्हणून मी 20 फेब्रुवारीला तक्रारही दाखल केली असे सपना गिलने सांगितले. तसेच गंभीर आरोप करताना तिने म्हटले, "मी तिथे जाऊन त्यांना थांबवले. माझ्या मित्राने पुरावा दाखवण्यासाठी व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी मला बेसबॉलने मारहाण केली. एक किंवा दोन लोकांनी मला मारले आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला कानाखाली मारली."
सपना गिलने फेटाळले आरोप
दरम्यान, आम्ही कोणाला मारहाण केली नाही, पैसेही मागितले नाहीत. त्यांनी आमच्यावर चुकीचे आरोप केले. मी एकही सेल्फी मागितला नाही. आम्ही आनंद घेत होतो, म्हणून माझ्या मित्राने व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. मी पाहिले की ते माझ्या मित्राला मारहाण करत आहेत असे सांगून सपना गिलने पृथ्वी शॉचे आरोप फेटाळले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सहारा स्टार हॉटेलजवळ ही घटना घडली होती. पृथ्वी शॉ आणि त्याचे मित्र एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. यादरम्यान क्रिकेटरचा एक चाहता आणि एक महिला चाहता त्याच्या टेबलाजवळ आला. महिला चाहत्याने क्रिकेटरसोबत सेल्फी काढण्यास सुरुवात केली. काही फोटो आणि व्हिडीओ काढूनही ती थांबली नाही, तेव्हा पृथ्वीने रेस्टॉरंटच्या मालकाला फोन करून चाहत्यांना हटवण्यास सांगितले. रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने चाहत्यांना तेथून हटवले. मात्र, यामुळे संतापलेले दोन्ही चाहते रेस्टॉरंटबाहेर क्रिकेटरची वाट पाहत राहिले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Sapna Gill has accused the cricketer that Prithvi Shaw and his friends were drunk and beat me up and touched my private parts
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.