Arjun Tendulkar Sara Tendulkar, IPL 2022: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने IPL मध्ये आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, परंतु अर्जुन तेंडुलकरला अद्याप संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्स व्यवस्थापन शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकरचा 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये समावेश करेल अशी आशा चाहत्यांना आहे. मुंबई फ्रँचायझीने सोमवारी अर्जुनचा एक फोटो शेअर केला. 'स्लो चेंडू की फास्ट यॉर्कर.. अर्जुन द्विधा मनस्थितीत अडकलेला दिसतो', असं कॅप्शन त्या फोटोसोबत होतं.
अर्जुन तेंडुलकरचा हा फोटो त्याची बहीण सारा तेंडुलकरनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. सारा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातच तिने हा फोटो शेअर केल्याने अर्जुनला शेवटच्या दोन सामन्यांसाठी संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या फोटोवर चाहतेही भरपूर कमेंट्स करताना दिसत आहेत. अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याची विनंती चाहत्यांनी मुंबई फ्रँचायझीला केली आहे. अर्जुनचे केवळ फोटोच पोस्ट करत राहणार की त्याला सामन्यातही संधी देणार? असा खोचक सवाल एका चाहत्याने केला आहे.
दरम्यान, IPL 2022 च्या मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले. गुजरात टायटन्सनेही अर्जुनला २० लाखांच्या मूळ किमतीसह विकत घेण्याची तयारी दर्शवली होती, पण अंतिम बाजी मुंबई इंडियन्सने मारली. अर्जुन तेंडुलकर गेल्या हंगामातही 'मुंबई इंडियन्स'चा भाग होता, पण IPL च्या त्या हंगामातदेखील तो एकही सामना खेळू शकला नाही.