भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी निवृत्ती घेईल, असे सर्वांनाच वाटत होते. पण, धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली. तो क्रिकेट कारकिर्दीबाबत कधी निर्णय घेईल, याची कोणालाही कल्पना नाही. तुर्तास तरी तो निवृत्तीचा विचार करत नाही हे पक्कं आहे. बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीच्या अध्यक्षतेखाली 24 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत धोनीच्या निवृत्तीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता आहे. एकीकडे 39 वर्षांचा धोनी अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत आहे, तर दुसरीकडे पाकच्या 32 वर्षीय माजी कर्णधाराच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे त्या क्रिकेटपटूची पत्नीही चांगलीच संतापली आहे. तिने थेट धोनीशी तुलना करताना माझ्या पतीला निवृत्तीचा सल्ला का देता, असा सवाल केला.
पाकिस्तान क्रिकेट मंडळात ( पीसीबी) सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळेच पाकिस्तान संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर पीसीबीनं मुख्य प्रशिक्षकच बदलला आणि आता तर कर्णधाराचीही उचलबांगडी केली आहे. पाकिस्तान संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार सर्फराजची हकालपट्टी करण्यात आली आहे. सर्फराज सध्या सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडत आहे. त्यामुळे त्याच्याकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली गेली. पीसीबीनं तर त्याला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता सर्फराजच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
सर्फराजच्या निवृत्तीच्या चर्चांवर मात्र त्याच्या पत्नीनं नाराजी प्रकट केली आहे. असं करताना तिनं थेट भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी तुलना केली आहे. खुशबहत सर्फराज असे तिचं नाव आहे. ती म्हणाली,''कर्णधारपद काढून घेतल्यामुळे माझा पती निराश झालेले नाहीत. हा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा निर्णय आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. हा निर्णय आम्हाला तीन दिवसांपूर्वीच माहित होता. त्यामुळे सर्फराजचे क्रिकेट करिअर संपले, असे अजिबात नाही. आता त्याला जबाबदारीमुक्त खेळ करता येईल.''
सर्फराज निवृत्तीचा विचार करतोय का, यावर ती म्हणाली,''त्यानं का निवृत्त व्हावे? आता तर तो केवळ 32 वर्षांचा आहे. धोनीचं वय काय? तो निवृत्त झाला आहे का? माझे पती दमदार कमबॅक करतील. तो लढवय्या आहे.''