टीम इंडियाचा स्टार बॅटर सर्फराज खानचा भाऊन आणि युवा क्रिकेटर मुशीर खान रस्ते अपघातात गंभीर जखमी झाला आहे. इराणी चषक स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड झालेला युवा क्रिकेटर वडील नौशाद खान यांच्यासोबत आझमगढ ते लखनऊ या मार्गावर प्रवास करताना कार अपघाताची दुर्घटना घडली. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात नेमका कसा झाला ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या अपघातात युवा क्रिकेटरला गंभीर इजा झाल्याचे समजते.
अपघातामुळे क्रिकेटपासून दूर राहण्याची वेळ
काही माध्यमातील रिपोर्टनुसार, या अपघातात युवा क्रिकेटरच्या मानेला अधिक मार लागला आहे. अपघात झालेल्या दुखापतीमुळे आता या युवा क्रिकेटरला अनेक दिवस क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते. दुखापतीतून रिकव्हर होण्यासाठी त्याला किमान ६ आठवडे किंवा तीन महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे इराणी चषकासाठीच्या लढतीशिवाय आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील काही सामन्यांनाही त्याला मुकावे लागू शकते. दुलिप करंडक स्पर्धेतील पदार्पणात या पठ्ठानं १८१ धावांची खेळी करुन लक्षवेधून घेतलं होते. भावा पाठोपाठ तोही टीम इंडियात एन्ट्री मारण्यासाठी तयार असल्याचे चित्रच त्याने आपल्या दमदार खेळीसह निर्माण केले. पण आता दुर्घटनेमुळे त्याच्या प्रवासात नवे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई संघालाही धक्का, त्याच्याशिवायच उतरावे लागणार मैदानात
रणजी स्पर्धेतील विजेता संघ मुंबई आणि शेष भारत यांच्यात १ ऑक्टोबरपासून इराणी चषकासाठी पाच दिवसीय सामना रंगणार आहे. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या मुंबईच्या संघात मुशीर खान याचेही नाव होते. दुलिप ट्रॉफी स्पर्धेनंतर पुन्हा एकदा तो भावासोबत खेळताना दिसणार होता. पण अपघातामुळे आता त्याला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. मुशीर खान याने आपल्यातील क्षमता दाखवून दिली आहे. या युवा खेळाडूमध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. पण आता मुंबई संघाला त्याच्याशिवायच मैदानात उतरावे लागेल. हा मुंबई संघासाठी एक धक्काच आहे.