भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) त्यांच्या वार्षिक करारात पुन्हा एकदा बदल केला आहे. देशांतर्गत क्रिकेटकडे पाठ फिरवणाऱ्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयने वार्षिक करारातून बाहेर केले. पण, त्यानंतर श्रेयस रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरी व फायनलच्या लढतीत खेळला होता. त्यामुळे त्याचा पुन्हा वार्षिक करारात घेतले जाईल अशी चर्चा होती, पण टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खान आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेल यांचा केंद्रीय कराराच्या गट क मध्ये समावेश करण्यात आला आहे.
चालू मोसमात तीन कसोटी सामने खेळण्याचे निकष या दोघांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांना १ कोटी रुपये वार्षिक रिटेनरशिप फी असलेल्या क गटात समाविष्ट करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत त्यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून मैदान गाजवणाऱ्या सर्फराजने इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली होती, तर आग्राच्या जुरेलने रांचीमध्ये कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद ९० आणि ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. जुरेलने त्याच्या दुसऱ्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
बीसीसीआय पुढील हंगामासाठी रणजी ट्रॉफी कॅलेंडरवर पुनर्विचार करू शकते आणि डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भारताच्या उत्तर भागात कोणतेही सामने न घेण्याची योजना आखू शकते. कारण त्यादरम्यान धुके आणि खराब प्रकाशामुळे सामना अनेकदा रद्द झाला आहे. गेल्या काही हंगामात रणजी ट्रॉफी जानेवारीमध्ये सुरू होत असून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात संपत आहे. दिल्ली, चंदीगड, कानपूर, मेरठ, जम्मू, धर्मशाला या उत्तर-भारतीय शहरांमधील बहुतेक सामने खराब प्रकाश आणि धुक्यामुळे प्रभावित होत आहेत.
- ग्रेड A+ - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.
- ग्रेड A - आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.
- ग्रेड ब - सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
- ग्रेड क - रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.