Join us  

Sarfaraz Khan: सरफराजने कधीही कोणाचा अपमान केला नाही, एमसीएच्या सूत्राने केला दावा

Sarfaraz Khan: मुंबईचा फलंदाज सरफराज खान याला पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघासाठी डावलण्यात आल्याने गदारोळ उठला. सरफराजचे वाढवलेले वजन आणि त्याची बेशिस्त वर्तणूक यामुळे त्याची भारतीय संघात निवड होत नसल्याच्या चर्चा रंगल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 6:20 AM

Open in App

नवी दिल्ली - मुंबईचा फलंदाज सरफराज खान याला पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघासाठी डावलण्यात आल्याने गदारोळ उठला. सरफराजचे वाढवलेले वजन आणि त्याची बेशिस्त वर्तणूक यामुळे त्याची भारतीय संघात निवड होत नसल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, याबाबत मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) एका सूत्राने आक्षेप घेत, ‘सरफराजने कधीही कोणाचाही अपमान केला नसून या निरर्थक चर्चा आहेत,’ असा दावा केला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका गटानुसार सरफराजला आपल्या तंदुरुस्तीचा स्तर उंचावण्याची गरज असून सोबतच मैदानात आणि मैदानाबाहेरील वर्तणूक चांगली ठेवण्याची गरज आहे. यावर मुंबई क्रिकेटच्या लोकांनी सरफराजचा बचाव केला आहे. गेल्या सत्रात दिल्लीविरुद्ध शतकी खेळी केल्यानंतर सरफराजने ड्रेसिंग रूमकडे पाहत अत्यंत आक्रमक पद्धतीने शतकाचा आनंद साजरा केला होता. त्याचा हा जल्लोष अनेकांना आवडला नाही. त्यावेळी सरफराजने स्टेडियममध्ये उपस्थित निवडकर्त्यांवर एक कटाक्ष टाकल्याचे मानण्यात आले होते. 

सरफराजशी अत्यंत जवळ असलेल्या एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यातील सरफराजने केलेला तो जल्लोष त्याचे संघ सहकारी आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्यासाठी होता. मुझुमदारनेही सरफराजच्या शतकाचे कौतुक करताना आपली टोपी काढून त्याला अभिवादन केले होते. त्यावेळी स्टेडियममध्ये निवडकर्ते चेतन शर्मा नव्हते, तर सलिल अंकोला उपस्थित होते. सरफराजने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघाला सावरले होते आणि हा त्यासाठीच केलेला जल्लोष होता. मोकळेपणे जल्लोष करणे गुन्हा आहे का? 

चंदू सरांना सरफराज मुलाप्रमाणे आहे!गेल्या वर्षी मध्य प्रदेशचे तत्कालीन प्रशिक्षक चंद्रकांत पंडित सरफराजच्या वर्तणुकीवर नाराज होते, असेही सांगितले जाते. याबाबत एमसीए सूत्राने सांगितले की, ‘चंदू सर सरफराजला आपल्या मुलाप्रमाणे मानतात. सरफराज १४ वर्षांचा असतानापासून ते त्याला ओळखतात. ते नेहमी सरफराजचे कौतुक करतात आणि सरफराजवर ते कधीही रागवणार नाहीत.’

यो-यो टेस्ट पास करूनही...देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारूनही सरफराजची निवड भारतीय कसोटी संघात का होत नाही, हे एक कोडंच आहे. तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी अत्यंत गरजेची असलेल्या यो-यो चाचणीची किमान गुणमर्यादा १६.५ इतकी आहे आणि सरफराजने हे गुण मिळवलेले आहेत. तसेच, अनेकदा सरफराजने दोन दिवस फलंदाजी केली आहे आणि दोन दिवस क्षेत्ररक्षणही केले आहे. तरीही त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.

टॅग्स :मुंबईबीसीसीआय
Open in App