भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने शुक्रवारी रात्री उशिरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली. या संघात काही नवे चेहरे आहेत. सूर्यकुमार यादवला त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे, तर ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे इशान किशनला संधी देण्यात आली आहे. पण एक खेळाडू असा आहे की जो सातत्याने धावाही करतोय, पण तो अद्यापही संघात स्थान मिळवू शकला नाही. हा खेळाडू आहे सरफराज खान.
दोन-तीन वर्षांपासून सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे, पण तरीही निवडकर्त्यांचे लक्ष त्याच्याकडे जात नाही. सरफराजचे देशांतर्गत क्रिकेटचे आकडे पाहिले तर आश्चर्य वाटेल.
तीन वर्षांपासून तुफान खेळीसरफराज गेल्या एक-दोन वर्षांपासून धावा करत नाहीये. तो सलग तीन वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. 2019-20 रणजी ट्रॉफी हंगामात या फलंदाजाने सहा सामन्यात 928 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 154.66 होती. त्याने तीन शतके आणि दोन अर्धशतके झळकली. गेल्या मोसमात तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. 2021-22 हंगामात त्याने सहा सामन्यांत 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. ज्यामध्ये चार शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मुंबईने फायनलमध्ये धडक मारली पण संघाला विजय मिळविता आला नव्हता.
यंदाच्या मोसमातही त्याने दमदार कामगिरी केली आहे. हैदराबादविरुद्ध त्याने नाबाद 126 धावा ठोकल्या. सौराष्ट्रविरुद्ध त्याने 75 धावांची खेळी खेळली. तामिळनाडूविरुद्ध त्याने तुफान फटकेबाजी करत 162 धावा केल्या होत्या.
उत्तम सरासरीसरफराज खानचे नाव ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यासोबत घेतले जाते. सरफराजची आतापर्यंतची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी पाहिली तर ती 80.47 आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम प्रथम श्रेणी सरासरीच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रॅडमन 95.14 च्या सरासरीने पहिल्या क्रमांकावर आहेत. सरफराजने 36 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3380 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 12 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.