Join us

सर्फराझ खानने उघड केले गुपित, गौतम गंभीरचा धक्कादायक आरोप; क्रिकेटविश्वात खळबळ

गंभीर सर्फराझची कारकीर्द संपवणार? सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:39 IST

Open in App

Sarfaraz Khan vs Gautam Gambhir, dressing room secrets | लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : 'बॉर्डर गावसकर चषक मालिकेतील मेलबोर्न कसोटी गमावल्यानंतर ड्रेसिंग रूममधील संघाच्या चर्चा सर्फराझ खानने उघड केल्या,' असा गंभीर आरोप भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी केला. यामुळे भारतीय क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. सर्फराझ या कसोटी मालिकेतील सर्व पाच सामन्यांत राखीव खेळाडू म्हणून बाहेर बसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर यांनी मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या 'बीसीसीआय'च्या बैठकीत सर्फराडावर हा आरोप लावला, या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर हेदेखील उपस्थित होते.

गंभीर सर्फराझची कारकीर्द संपवणार?

गंभीर यांनी सर्फराझ खानवर आरोप लावल्यानंतर सोशल मीडियावर गंभीर यांच्यावर नेटिझन्सनी टीका केली आहे. गंभीर आता सर्फराझची कारकीर्द संपवूनच शांत बसणार, असे चाहत्यांनी म्हटले आहे. एका चाहत्याने लिहिले की, गंभीर आता सर्फराझची कारकीर्द संपवू शकतात.' एका अन्य व्यक्तीने लिहिले की, 'पराभवाच्या टीकेपासून वाचण्यासाठी गंभीर यांनी सर्फराझला बळीचा बकरा बनवले आहे.' एका चाहत्याने लिहिले की, गंभीर प्रशिक्षक असेपर्यंत सर्फराइझला अंतिम ११ काय, तर १५ खेळाडूंमध्येही स्थान मिळण्याची शक्यता नाही.

ड्रेसिंग रूममध्ये काय झाले होते?

'बॉक्सिंग डे' कसोटीत परिस्थितीनुसार खेळ न केल्याने गंभीर खूप रागामध्ये होते. त्यांना या गोष्टीचाही राग होता की, फलंदाजांनी परिस्थितीनुसार खेळ न करता आपला नैसर्गिक खेळ केला. यामुळे संघ पराभवाच्या खाईत लोटला गेला. गंभीर यांनी खेळाडूंना धमकी दिली होती की, एकतर खेळाडूंनी त्यांच्या योजनेनुसार खेळावे, नाहीतर संघाबाहेर बसावे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रेसिंग रूममध्ये गंभीर खेळाडूंवर रागावल्या प्रकरणाची चर्चा सर्फराझ खानने कथित रूपाने उघड केल्या.

पुरावा काय?

गंभीर यांनी लावलेल्या आरोपानंतर 'बीसीसीआय'चे हितचिंतक सर्फराझ खानवर नाराज झाले आहेत. त्याच वेळी, गंभीर यांच्याकडे याप्रकरणी कोणते पुरावे आहेत, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. सर्फराझने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असून, त्याने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह एकूण ३७१ धावा काढल्या आहेत.

स्वीय सहायकामुळे स्थिती 'गंभीर'

प्रशिक्षक गौतम गंभीर स्वीय सहायकामुळे (पीए) अडचणीत आले आहेत. समोर आलेल्या वृत्तांनुसार, प्रत्येक ठिकाणी गंभीर आपल्यासोबत स्वीय सहायकाला नेत असल्याने 'बीसीसीआयचे अधिकारी नाराज आहेत. यामुळे गंभीर यांच्यावर कारवाईही होऊ शकते. 'बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, निवडकर्ते कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीत चर्चा करत नाही. अशा परिस्थितीत अॅडिलेड येथे 'बीसीसीआय'च्या हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये गंभीर यांच्या स्वीय सहायकाला जागा का मिळाली? तसेच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी राखीव केलेल्या नाश्त्याच्या ठिकाणीही गंभीर यांच्या स्वीय सहायकाला पाहण्यात आले. असे का?,' अरण प्रश्नही बीसीसीआय अधिकाऱ्याने उपस्थित केला.

दरम्यान, सर्फराझने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळून ३७१ धावा काढल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

टॅग्स :गौतम गंभीरसर्फराज खानभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ