भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ४-१ असा दणदणीत विजय मिळवून अनेक विक्रम मोडली. अनेक सीनियर खेळाडूंच्या गैरहजेरीत पार पडलेल्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाने अनेक युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. यशस्वी जैस्वाल या मालिकेतील स्टार ठरला आणि त्याला मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप यांनीही मिळालेल्या संधीचं सोनं केलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराजला अखेर भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या मालिकेत ३ अर्धशतकांसह २०० धावा केल्या. या मालिकेतील आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्याच्या अनुभवाबद्दल सर्फराज खानने ( Sarfaraz Khan) याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याने रोहितच्या नेतृत्वाच्या शैलीची बरोबरी ही बॉलिवूड चित्रपट लगानमधील भुवनशी केली.
''रोहित भाई के साथ खेल के भी मुजे बहुम मजा आया... मी बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय, ९-१० वर्ष आयपीएल खेळतोय, स्थानिक क्रिकेट खेळतोय. पण, मला रोहित भाई सोबत खेळून खूप मजा आली. त्याला पाहताच एकदम प्रेमात पडल्यासारखं होतं, एवढा जांगला माणूस तो आहे. तो सर्वांना सोबत घेऊन चालतो. जेव्हा तो खेळाडूंसोबत बोलत असतात, तेव्हा मला लगान चित्रपटातील आमीर खान आठवतो,''असे सर्फराज खान म्हणाला.
तो पुढे म्हणाला,''रोहित एवढं ओरडत नाही, फक्त समजावतो. प्रत्येकाची बोलण्याची, समजावण्याची शैली वेगळी असते. त्यामुळे तो ओरडतो असं मला कधी वाटलं नाही, कारण मुंबईची भाषाच तशी आहे. इथे तू करून बोललं जातं, याचा अर्थ तो ओरडा देतोय असं होत नाही. ही आमच्या मुंबईकरांची स्टाईल आहे. आम्ही असंच बोलतो. रोहित ज्युनियर खेळाडूंना तुम्ही ज्युनियर आहात असे कधीच भासू देत नाही.''
राजकोट कसोटीत माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या हस्ते सर्फराजला पदार्पणाची कसोटी कॅप दिली गेली. त्याने पहिल्याच कसोटीत दोन अर्धशतकं झळकावून महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ''लहानपणापासून मी कसोटी क्रिकेटच्या महत्त्व सांगणाऱ्या कथा ऐकत वाढलोय.. माझ्या वडिलांनी कसोटी क्रिकेटचं मला महत्त्व समजावून सांगितलं होतं. पहिलीच कसोटी मालिका खेळताना माझ्यावर दडपण होतं,'' असेही सर्फराज म्हणाला.
कसोटी पदार्पणापूर्वी इंस्टाग्रामवर माझे ६००-७००k फॉलोअर्स होते, परंतु राजकोट कसोटीनंतर १.५ मिलियन फॉलोअर्स झाल्याचे गमतीने तो म्हणाला.