IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलैपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे. बीसीसीआयने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी व वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ या सर्कलमधील भारताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेसाठीच्या कसोटी संघात अनुभवी चेतेश्वर पुजाराचे नाव दिसत नाही, तर यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराज खानला न निवडल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला.
सुनील गावस्कर यांनी तर देशांतर्गत क्रिकेट खेळायचे की नाही, असा थेट सवाल केला. भारतीय संघात निवडीसाठी देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरीचा विचार होत नसेल तर त्या स्पर्धा का खेळायच्या, असेही गावस्करांनी विचारले. पण, विंडीज दौऱ्यासाठी संधी न मिळालेला सर्फराज दुलिप ट्रॉफीत वेस्ट झोनकडून मैदानावर उतरला आहे. पण, तेथे तो फेल झाला. शिवम मावीने सर्फराजचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. या दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव याचीही निवड झाली नव्हती आणि तोही दुलिप ट्रॉफीत ७ धावांवर शिवम मावीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हे दोघंही पश्चिम विभागाकडून खेळत आहेत आणि मध्य विभागाने त्यांच्या संघाची अवस्था ६ बाद १४५ अशी केली आहे.
सर्फराजने स्थानिक क्रिकेटमध्ये २०२० पासून सलग तिसऱ्या वर्षात दमदार कामगिरी केली आहे. यात त्याने १२ शतकांसह २४४१ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर किमान ५० डावांत सर्वाधिक सरासरी असलेला सर्फराज हा दुसरा फलंदाज आहे. ब्रॅडमन यांची सरासरी १०५.४ इतकी आहे, तर सर्फराजने ५३ सामन्यांत ८२.६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. सर्फराजने एकूण ५३ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ अर्धशतकं व १३ शतकांसह ३४८० धावा केल्या आहेत.