Vijay Hazare Trophy : भारतीय संघातून बाहेर बसवलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) बुधवारी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्फराज खानसह अविश्वसनीय खेळी केली. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी मुंबईला आजच्या रेल्वेविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे गरजेचे होते. पण, ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची आघाडीची फळी ढेपाळली आणि अशा परिस्थित अजिंक्य-सर्फराज जोडी उभी राहीली. या दोघांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना १५२ धावांची भागीदारी करून मुंबईला विजय मिळवून दिला आणि स्पर्धेतील आव्हानही कायम राखले.
प्रथम फलंदाजी करताना रेल्वेने ५ बाद ३३७ धावा केल्या. प्रथम सिंगने १०८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह १०९ धावा केल्या. मोहम्मद सैफने ७७ चेंडूंत ९२ धावांची वेगवान खेळी करताना ७ चौकार व ४ षटकार खेचले. विवेक सिंग ( ४७), कर्ण शर्मा ९ चेंडूंत नाबाद ३१ धावा आणि उपेंद्र यादव ( २२) यांनीही योगदान दिले. प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ४ धावा करून माघारी परतला. पृथ्वी शॉ व अरमान जाफर यांनी काही काळ खिंड लढवली. जाफर २७ चेंडूंत ३० धावांवर, तर पृथ्वी ४७ चेंडूंत ५१ धावांवर बाद झाल्याने मुंबईची अवस्था ३ बाद १०७ धावा अशी झाली होती.
कर्णधार अजिंक्यने विकेट टिकवताना सर्फराजला टेंशन फ्री खेळ करू दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली. अजिंक्य ८२ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८८ धावा करून माघारी परतला. सर्फराजने स्थानिक क्रिकेटमधील आपला झंझावात कायम राखताना शतक झळकावले. त्याने ९४ चेंडूत १० चौकार व ५ षटकारांसह ११७ धावांची खेळी केली. श्याम मुलानीने ३१ चेंडूंत नाबाद ४६ धावा करून मुंबईला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"