नवी दिल्ली : बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतींसाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पणाची संधी दिली, परंतु रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा करणाऱ्या सरफराज खानला ( Sarfraz Khan) पुन्हा डावलले. त्यानंतर खेळाडूने मोजक्या शब्दात आपले दुःख व्यक्त केले होते. पण, तो तिथेच थांबला नाही. त्याने दिल्ली संघाविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात मुंबईचा संघ 4 बाद 66 धावा असा अडचणीत असताना पठ्ठ्याने आणखी एक शतक झळकावून निवड समितीला सडेतोड उत्तर दिले होते. खरं तर सरफराज खानने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत संधी न मिळाल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
संघ जाहीर झाल्यानंतर रात्रभर झोपलो नाही - सरफराज भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर सरफराज खानने निवडकर्त्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची व्यथा मांडली होती. तो म्हणाला होता की, "संघ निवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी आसामहून दिल्लीला आलो (रणजी ट्रॉफी सामन्यानंतर) आणि रात्रभर झोपू शकलो नाही. मी स्वतःला विचारत राहिलो की मी तिथे का नाही. पण, वडिलांशी बोलल्यानंतर मला थोडा धीर मिळाला आहे."
"माझा पण नंबर येईल""मी सराव सोडणार नाही. मी अजिबात तणावात जाणार नाही. मी प्रयत्न करत राहीन", असे त्याने अधिक म्हटले. मात्र, कुठेतरी त्याला वाईटही वाटत असल्याची कबुलीही त्याने दिली. "मी पूर्णपणे तुटलो होतो. खासकरून इतक्या धावा केल्यावर कोणासाठीही हे स्वाभाविक आहे. मी पण माणूस आहे, यंत्र नाही. मलाही भावना आहेत. मी माझ्या वडिलांशी बोललो आणि ते दिल्लीला आले. आम्ही दिल्लीतही सराव केला", अशा शब्दांत सरफराजने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
अशातच सरफराज खानच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एक भावनिक प्रसंग सांगितला आहे. सरफराज खानचे वडील नौशाद खान यांनी आपल्या मुलाची हृदयस्पर्शी कथा सांगून सर्वांचे लक्ष वेधले. "एक अतिशय तरुण सरफराज अनेकदा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनसोबत किंवा त्याच्याविरुद्ध ज्युनियर क्रिकेट खेळत असे. एके दिवशी लहान सरफराजने मला सांगितले की, अब्बू, अर्जुन किती नशीबवाला आहे ना? तो सचिन सरांचा मुलगा आहे, आणि त्याच्याकडे कार, आय-पॅड, सर्व काही आहे", सरफराजचा हा किस्सा सांगताना त्याचे वडील नौशाद खान देखील भावूक झाले.
भावूक करणारा प्रसंग लहान सरफराज खानच्या प्रश्नाला उत्तर देताना नौशाद यांनी नम्रपणे होकार दिला. काळजीत पडण्याशिवाय ते काहीही बोलू किंवा करू शकत नव्हते. पण तेवढ्यात त्यांचा मुलगा (सरफराज) धावत त्यांच्याजवळ आला आणि त्यांना घट्ट मिठी मारली. भावनिक होत सरफराजने आपल्या वडिलांना म्हटले, "मी त्याच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहे. कारण तुम्ही संपूर्ण दिवस माझ्यासाठी देऊ शकता. त्याचे वडील त्याला वेळ देऊ शकत नाहीत." सरफराज खान आणि त्याच्या वडिलांचा हा भावनिक प्रसंग सर्वांनाच भावूक करणारा आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, ईशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"