Join us  

सर्फराज खानच्या वडिलांच्या नावाने स्कॅम; दिलं जातंय IPL अन् राज्य संघात स्थान देण्याचे आमिष

नौशाद हे मुंबई क्रिकेट कोचिंगमधील एक महत्त्वाचं नाव आहे आणि आता त्यांच्या नावाने स्कॅम सुरू झाल्याची घटना समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 3:54 PM

Open in App

भारत-इंग्लंड मालिकेत अखेर सर्फराज खानला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. राजकोट कसोटीत सर्फराजला कसोटी कॅप दिली गेली तेव्हा शेजारीच उभे असलेले त्याचे वडील व गुरू नौशाद खान यांचे डोळे आनंदाश्रूने भरले होते. मुलाला त्याच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीचं फळ मिळाला, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण, आज तोच चेहरा थोडा गंभीर दिसला.. नौशाद हे मुंबई क्रिकेट कोचिंगमधील एक महत्त्वाचं नाव आहे आणि आता त्यांच्या नावाने स्कॅम सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. नौशाद यांनी स्वतः एक व्हिडीओ पोस्ट करून या स्कॅमबाबत गौप्यस्फोट केला आणि पालकांना आवाहन केलं.  

नौशाद खान यांनी भारतीय क्रिकेटला मुशीर व सर्फराज हे दोन युवा प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. आता त्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाऊंट सुरू केला गेला आहे आणि त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा उचलून पालकांकडून पैसे लाटले जात आहेत. पालकांना त्यांच्या मुलांना आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून किंवा राज्य संघात निवडले जाण्याचं आमिष दाखवत पैसे मागितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडतोय.   "शुभ सकाळ, मित्रांनो. माझ्या नावाचा (नौशाद खान) वापर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फेक आयडी बनवण्यासाठी अनेक लोक करत असल्याने मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आलो आहे.  तुमचा मुलांना ते आयपीएलमध्ये नेट बॉलर बनतील, अकादमीमध्ये निवडले जातील किंवा राज्य संघात असतील असे सांगून त्यांच्याकडून पैसे मागत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की यात अडकू नका आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. मी सध्या कोणत्याही आयपीएल संघाशी जोडलेले नाही. मी सध्या प्रशिक्षक म्हणून कुठेही जात नाही. त्यामुळे या आमीषांना तुम्ही बळी पडू नका. तुमचे खूप खूप आभार,” असे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केले आहे. 

सर्फराज खानसाठी आयपीएल फ्रँचायझींमध्ये चढाओढसर्फराजची कसोटीतील खेळी पाहून कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. आयपीएल २०२४ साठी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या लिलावात मुंबईचा खेळाडू अनसोल्ड राहिला होता. १० पैकी एकाही फ्रँचायझीने २० लाख मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी बोली लावली नव्हती. पण, आता त्याला आयपीएलचा करार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   

टॅग्स :सर्फराज खानऑफ द फिल्ड