बंगळुरू : भारतीय अ संघ गुरुवारपासून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध पहिली चार दिवसांची अनधिकृत कसोटी खेळण्यास मैदानावर उतरेल तेव्हा सरफराज खान आणि कुलदीप यादव यांच्या कामगिरीकडे चाहत्यांची नजर असेल.
प्रतिस्पर्धी संघातील किमान सहा खेळाडू मागील काही वर्षांत राष्ट्रीय संघातून खेळले आहेत. त्यामुळे यजमान संघापुढे ते कडवे आव्हान उभे करू शकतील. भारतीय संघातही मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध खेळलेल्या अनेक खेळाडूंचा भरणा आहे. मात्र, सर्वाधिक लक्ष असेल ते सरफराजवर. काही महिन्यांपूर्वी त्याने याच मैदानावर रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी केली होती. रणजी सत्रात एक हजार धावा ठोकणारा सरफराज राष्ट्रीय संघात स्थान पटकविणाऱ्यांच्या रांगेत आहे.भारताला डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. सरफराज हा या दौऱ्यासाठी भक्कम दावेदार असेल.