नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बरेच चाहते आहेत. काही संघांमध्येही त्याला मानणारे खेळाडू आहेत. काही जणं धोनीची स्टाईल मारण्याचा प्रयत्नही करतात. त्याची हेअरस्टाईल, त्याची खेळण्याची शैली या गोष्टी कॉपी करतात. पण जे धोनीला जमतं ते त्याच्या चाहत्यांना जमतंच असं नाही. एक पाकिस्तानचा खेळाडू धोनीसारखी स्टाईल मारायला गेला आणि फसला.
पाकिस्तानची झिम्बाब्वेबरोबर एकदिवसीय क्रिकेट मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत पाकिस्तानने 5-0 असा दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने पाचव्या एकदिवसीय लढतीत 131 धावांनी विजय मिळवत मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखलं. या पाचव्या सामन्यातंच पाकिस्तानचा एक खेळाडू धोनीची स्टाईल मारायला गेला. पण त्याला काही धोनीची ही स्टाएल झेपली नाही.
तर झालं असं की, पाकिस्तान पाचवा एकदिवसीय सामना जिंकणार हे काही षटकांपूर्वीच साऱ्यांना समजलं होतं. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार आणि यष्टीरक्षक सर्फराझ अहमदला धोनीची स्टाईल मारायचा मोह आवरला नाही. त्याने फखर झामनला यष्टीरक्षण करायला सांगितले आणि त्याने गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. यावेळी आपणंही फलंदाजी, यष्टीरक्षणाबरोबर धोनीसारखी गोलंदाजीही करू शकतो, हे सर्फराझला दाखवायचे होते. पण त्याच्या एका चेंडूवर झिम्बाब्वेच्या पीटर मूरने मिट विकेटला षटकार लगावला आणि आपण गोलंदाजी करत असल्याचा पश्चाताप सर्फराझला झाला. त्यामुळे यापुढे आपण धोनीची स्टाईल मारायची नाही, हा धडा त्याने नक्कीच घेतला आहे.