मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध (IND vs AUS) होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघ जाहीर केला आहे. हा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या महत्त्वाच्या लढतीसाठी बीसीसीआयने एक रणनिती आखली असून ३ युवा खेळाडू संघासोबत इंग्लंडला जाणार आहेत.
ऋतुराज गायकवाड, सरफराज खान आणि इशान किशन राखीव खेळाडू म्हणून संघासोबत इंग्लंडला जाणार आहेत. सरफराज आणि ऋतुराज अतिरिक्त फलंदाज म्हणून तर किशन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघासोबत असेल. याशिवाय मुकेश कुमार आणि नवदीप सैनी या अतिरिक्त गोलंदाजांना देखील बीसीसीआयने राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले आहे.
WTC फायनलसाठी BCCI ची 'रणनीती'InsideSportने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या स्पर्धेनंतर लगेचच अर्थात ७ ते ८ जून यादरम्यान भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा अंतिम सामना होणार आहे. भारतीय खेळाडू आयपीएल खेळून नुकतेच बाहेर पडतील त्यामुळे टीम इंडियातील शिलेदारांना इंग्लंडच्या खेळपट्टीवर खेळण्याचा सराव व्हावा यासाठी बीसीसीय राखीव खेळाडूंना संघासोबत पाठवणार आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड कोचिंग स्टाफ आणि आयपीएल प्लेऑफमधून बाहेर झालेल्या संघातील खेळाडू २३ मे रोजी इंग्लंडला रवाना होतील.
"लोकेश राहुल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २३-२४ मे च्या सुमारास लंडनला रवाना होईल. तर काही खेळाडू द्रविड यांच्यासोबत निघून जातील कारण त्यांची आयपीएल मोहीम संपलेली असेल", असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"