कोलकाता : रणजी मोसमात धावांची टांकसाळ उघडणारा मुंबईचा स्टार फलंदाज सर्फराज खान बोटाला झालेल्या दुखापतीमुळे इराणी चषकातून बाहेर पडला आहे. सौराष्ट्रविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात त्याची शेष भारत संघात निवड झाली होती. दुखापतीमुळे त्याने सराव सामन्यातसुद्धा भाग घेतला नाही.
इराणी चषकाचा सामना १ मार्चपासून ग्वाल्हेरच्या मैदानावर खेळविला जाणार आहे. सर्फराजचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. त्याला यातून सावरण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागेल. पण दुसरीकडे सर्फराजसारख्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाची अनुपस्थिती शेष भारत संघाला जाणवणार आहे.
सराव सामन्यात पृथ्वी शॉने मार्गदर्शक सौरव गांगुली आणि सहायक प्रशिक्षक प्रवीण आमरेसमोर आक्रमक खेळाचा नजराणा पेश केला. त्याने मैदानाच्या प्रत्येक बाजूला फटके लगावले. सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला आणि ठरावीक स्थानिक सामने खेळणारा इशांत शर्मा सराव सामन्यात लयीमध्ये दिसला नाही. विशेष म्हणजे सराव सामना असल्याने त्याने दोन्ही संघांकडून गोलंदाजी केली. नंतर इशांत बराच काळ गांगुलीशी चर्चा करत होता.
१ मार्चपासून सौराष्ट्रविरुद्ध रंगणाऱ्या इराणी चषकाच्या सामन्याआधी शेष भारत संघाला खेळाडूंमध्ये योग्य सन्मवय घडवून आणावा लागेल. कारण झुंझार खेळ करण्यात सौराष्ट्रचा संघ पटाईत आहे. तसेच सर्फराज खेळणार नसल्यामुळे शेष भारत संघाला मधल्या फळीत अधिक जबाबदारीने खेळ करावा लागेल. बंगालच्या इशान पोरेलकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे. सराव सामन्यात त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही सर्वांना प्रभावित केले.