शारजाह : सावध परंतु भक्कम सुरुवात केलेल्या सुपरनोव्हाज संघाने महिला टी२० चॅलेंज स्पर्धेच्या सलामी सामन्यात वेलोसिटीविरुद्ध २० षटकांत ८ बाद १२६ धावांची मजल मारली. सलामीवीर चमारी अटापट्टूने ३९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांची खेळी करत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. एकता बिष्टने ३ बळी घेत जबरदस्त मारा केला.
शारजाहच्या लहान मैदानावर नाणेफेक जिंकून वेलोसिटीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रिया पूनिया आणि अटापट्टू यांनी सावध सुरुवात करताना खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. प्रिया चांगल्या फॉर्ममध्ये दिसली. दोन चौकार मारल्यानंतरही तिला मोठी खेळी करता आली नाही. यानंतर स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जही केवळ ७ धावा करत बाद झाली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने अटापट्टूला चांगली साथ देत ४७ धावांची भागीदारी करुन संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. अटापट्टू बाद झाल्यानंतर हरमनप्रीतने २७ चेंडूत ३१ धावा फटकावल्या. वेलोसिटीकडून जहानरा आलम, लेघ कास्पेरेक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. सुपरनोव्हाजने १७व्या षटकापासून १५ धावांत ५ बळी गमावले आणि याचा त्यांना मोठा फटका बसला.