मुंबई : न्यूझीलंडमध्ये 2010 साली झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात प्रतिनिधित्व केलेल्या सौरभ नेत्रावलकरची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मुंबईचा माजी मध्यमगती गोलंदाज सौरभ लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मनदीप सिंग, संदीप शर्मा आणि जयदेव उनाडकट यांच्यासोबत खेळला. 2013-14च्या हंगामात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यालाही भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करायचे होते, परंतु नियतीला ते मान्य नव्हते.
सौरभने सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या शिक्षणासाठी अमेरिका गाठले. मात्र, त्याला क्रिकेटपासून फार काळ लांब राहता आले नाही. नियतीने त्याला पुन्हा मैदानावर उतरण्यास भाग पाडले आणि आता तो अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार झाला आहे. इब्राहिम खलील या भारताच्याच खेळाडूच्या जागी त्याची निवड झाली आहे.