सौरभ नेत्रावरळकर हे नाव आतापर्यंत भारतीयांच्या घराघरात पोहोचले आहे... यापूर्वी जेव्हा हा खेळाडू भारताकडून १९ वर्षांखालील वर्ल्ड कप खेळला होता, तेव्हाही अनेकांनी त्याच्यानावाकडे काणाडोळा केला असावा.. पण, आज हाच सौरभ जेव्हा अमेरिकेकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप गाजवतोय, तेव्हा त्याची चर्चा मुंबई ते दिल्ली अन् कोलकाता ते गुजरात अशी होताना दिसतेय... मुळचा मुंबईचा सौरभ इंजिनियर आहे आणि कामासाठी तो अमेरिकेत गेला.. पण, क्रिकेट त्याच्या नशिबातच होतं आणि तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेचा स्टार झाला आहे. पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केल्यानंतर भारताविरुद्ध सौरभने विराट कोहली व रोहित शर्मा या तगड्या फलंदाजांची विकेट घेतली.
सौरभच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारा अमेरिकेचा संघ सुपर ८ च्या उंबरठ्यावर उभा आहे. सौरभ जरी क्रिकेटचे मैदान गाजवत असला तरी ज्या कामाचा त्याचा पगार मिळतो, त्याला तो विसरलेला नाही. क्रिकेटपटू व सॉफ्टवेअर इंजिनियर अशी दुहेरी भूमिका तो पार पाडतोय. क्रिकेट खेळून झाल्यावर तो हॉटेल रुममधून कंपनीसाठी काम करतोय.
निधीने खुलासा केला की तिचा भाऊ त्याच्या व्यावसायिक आणि क्रीडा जबाबदाऱ्या कशा अखंडपणे पार पाडतो, "तो भारतात येतो तेव्हाही तो त्याचा लॅपटॉप घेऊन येतो, तो काम करतो...तो तसा खूप समर्पित आहे. त्याच्यात तो मुंबईकर आहे.''