Join us  

तरुणांना संधी मिळावी म्हणून, भारतीय फलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, १५ तारखेपासून सुरू होणारा सामना शेवटचा

१० हजाराहून अधिक धावा नावावर असलेल्या फलंदाजाने तरुणांना संधी मिळावी म्हणून घेतला निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 9:47 AM

Open in App

महेंद्रसिंग धोनीच्या झारखंड राज्याकडून खेळणारा आणि कॅप्टन कूलसारखी हेअर स्टाईल ठेवणाऱ्या सौरभ तिवारीने ( Saurabh Tiwary) व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३४ वर्षीय सौरभ १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील सामना हा त्याचा शेवटचा सामना असणार आहे. तिवारीने वयाच्या ११व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. २००६-०७ मध्ये त्याने रणजी करंडक स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.  

तिवारीने २०१० मध्ये मुंबई इंडियन्ससाठी ४१९ धावा ठोकल्या आणि त्याच वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली. परंतु त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्याने तीन वन डे सामन्यांत ४९ धावा केल्या आणि त्यापैकी दोनवेळा तो नाबाद राहिला. तिवारीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये १७ वर्षात ११५ प्रथम श्रेणी सामने खेळले आणि ४७.५१ च्या सरासरीने २२ शतकं आणि ३४ अर्धशतकांसह १८९ डावांमध्ये ८०३० धावा केल्या.

जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमवर पत्रकार परिषदेत तिवारी म्हणाला, “मी माझ्या शालेय शिक्षणापूर्वी सुरू केलेल्या या प्रवासाला निरोप देणे थोडे कठीण आहे. पण मला खात्री आहे की यासाठी हिच योग्य वेळ आहे. मला असे वाटते की जर तुम्ही राष्ट्रीय संघात आणि आयपीएलमध्ये नसाल तर एखाद्या तरुणासाठी राज्य संघात जागा सोडणे चांगले आहे.''"केवळ माझ्या कामगिरीच्या आधारावर मी हे ठरवले असे नाही. रणजी आणि मागील देशांतर्गत हंगामातील माझा विक्रम तुम्ही पाहू शकता. मी पुढे काय करणार आहे, असे विचारले जाते आणि सध्या मला फक्त क्रिकेट हेच माहीत आहे. मला फक्त एकच गोष्ट माहित आहे त्यामुळे मी या खेळाशी जोडले जाणार आहे. मला राजकारणातूनही ऑफर आली होती पण मी त्याबद्दल विचार केलेला नाही."

तिवारीने IPL मध्ये १४९४ धावा केल्या आहेत. एकूण ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये त्याने २९.०२ च्या सरासरीने १६ अर्धशतकांसह ३४५४ धावा केल्या आहेत. त्याने एकूण ८८ सामन्यांत राज्याचे कर्णधारपद भूषवले आणि त्यापैकी ३६ विजय मिळवले, तर ३३ मध्ये पराभव व १९ सामने अनिर्णित राहिले.  लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ११६ सामन्यांत ४६.५५ च्या सरासरीने ४०५० धावा केल्या. त्यात ६ शतकं व २७ अर्धशतकांचा समावेश आहे.  

टॅग्स :मुंबई इंडियन्सबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ