कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला मोठ्या बदलांना सामोरं जावं लागलं आहे. क्रीडा क्षेत्रालाही याची झळ बसली. प्रत्येक खेळात काहीतरी बदल करावे लागले आहेत आणि सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे 'बायो बबल'चे निर्बंध. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आता 'बायो बबल'च्या नियमांनुसारच सहभागी व्हावं लागतं. जगभरातील अनेक खेळाडूंनी 'बायो बबल'च्या अडचणींवर भाष्य केलं आहे. बायो बबलमुळे मानसिकरित्या थकवा येतो अशा तक्रारी अनेक खेळाडूंनी केल्या आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौवर गांगुली याने मात्र या 'बायो बबल'च्या नियमांवरुन भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं आहे. भारतीय खेळाडू प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमी सज्ज असतात, असं वक्तव्य सौरवनं केलं आहे. (saurav ganguly said indians are more tolerant)
कोरोना काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाल्यापासून सर्व खेळाडूंना आता 'बायो बबल'मध्ये राहावं लागतं. यात खेळाडूंना त्यांच्या हॉटेलमध्ये राहावं लागतं. त्यांच्या प्रवासावर आणि हालचालींवर निर्बंध येतात. त्यांना कुणाला भेटताही येत नाही. स्टेडियम आणि हॉटेल असा इतकाच प्रवास करण्याची मुभा खेळाडूंना असते. यामुळे खेळाडूंना एकटं पडल्याचा अनुभव येत असून मानसिकरित्या खचून जात असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.
सौरवनं केलं भारतीय खेळाडूंचं कौतुकभारतीय खेळाडू हे परदेशी खेळाडूंपेक्षा मानसिकरित्या अधिक सक्षम आणि सहनशील असल्याचं सौरव गांगुलीनं म्हटलं आहे. सौरवनं एका ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी बायो बबलच्या मुद्द्यावर त्यांनं महत्वाचं विधान केलं. "परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडू अधिक सहनशील आहेत असं मला वाटतं. मी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज अशा अनेक परदेशी खेळाडूंसोबत खेळलो आहेत. ते मानसिरित्या लवकर पराभव स्वीकारतात. पण गेल्या सहा-सात महिन्यांपासून बायो-बबलमध्ये क्रिकेट होत आहे आणि नक्कीच ही खूप कठीण गोष्ट आहे. हॉटेलची खोली आणि स्टेडियम या व्यतिरिक्त कुठंही जाता येत नाही. खेळातल्या दबावाला सामोरं जाणं आणि त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये एका खोलीत येणं नंतर पुन्हा मैदानात जाणं हे एक वेगळंच जग आहे", असं सौरव गांगुली म्हणाला.
मानसिकरित्या तयार राहा"कोरोना काही सहजपणे जाणाऱ्यातला नाही आणि याचा धोका कायम राहील. त्यामुळे खेळाडूंना सकारात्मक राहावं लागेल. तुम्हाला स्वत:ला मानसिकरित्या तयारी करावी लागेल आणि आपल्याला खेळाडूंना मानसिकरित्या प्रशिक्षित करावं लागेल. जेणेकरुन खेळाडूंना मदत होईल. तुम्ही तयारी कशी आणि किती करता यावर सारं अवलंबून असतं", असं गांगुली म्हणाला.