kolkata doctor case : कोलकाता येथे ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच बदलापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावरून रोष व्यक्त करत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू सौरव गांगुलीने देखील याप्रकरणी बोलताना संताप व्यक्त केला. कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. गांगुलीच्या कुटुंबीयांनी लाँग मार्चमध्ये सहभागी होत निषेध व्यक्त केला.
सौरव गांगुलीसह त्याची पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सना गांगुली उपस्थित होती. डोना गांगुलीने सांगितले की, आम्हाला न्याय हवा आहे. अत्याचाराच्या घटनांना आळा बसलाच पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही अशा घटना घडत असल्या तरी त्या थांबल्याच पाहिजेत. दररोज अशा घटनांबद्दल ऐकून खूप दु:ख होते. २०२४ मध्येही अशा घटना घडत आहेत हे दुर्दैव. मी कोलकातात जास्त वास्तव्यास नसते... पण हे माझे घर आहे. अशा वाईट प्रवृत्तींना ठेचायलाच हवे.
गांगुलीची लेक सना गांगुलीने देखील तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध केला. काहीही झाले तरी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत न्याय हवा आहे. आपण दररोज कोणत्या ना कोणत्या बलात्काराच्या घटना ऐकतो. मला वाईट वाटते की हे २०२४ मध्येही होत आहे, असे सना गांगुलीने नमूद केले.