क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, याचा नेम नाही. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असे म्हटलं जातं. येथे क्षणात होत्याचं नव्हत व्हायला वेळ लागत नाही. त्यात क्रिकेटमध्ये घडलेले हादसे आणि खेळाडूंना गमवावा लागलेला जीव, हेही नवीन नाही. हैदराबाद येथील एका क्लब सामन्यात असा प्रसंग घडला की, त्यात फलंदाजाला जीव गमवावा लागला.
या सामन्यात 41 वर्षीय फलंदाज वीरेंद्र नाईकचा मृत्यू झाला. तो मारडपल्ली स्पोर्टिंग क्लबचे प्रतिनिधित्व करत होता आणि त्यानं त्या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळीही केली होती. पण, पंचांनी त्याला बाद दिले आणि या निर्णयावर तो नाखूश होता. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकलनं हे वृत्त दिलं. त्यानुसार वीरेंद्रचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाला. वीरेंद्र हा छातीच्या दुखण्यावर औषध घेत असल्याची माहिती त्याचा भाऊ अविनाश याने पोलिसांना दिली. शवविच्छेदनानंतर वीरेंद्रवर अंतिमसंस्कार करण्यात आले. वीरेंद्र हा महाराष्ट्रातील सावंतवाडीचा रहिवाशी होता.
त्या सामन्यात वीरेंद्रनं 66 धावांची खेळी केली. पण, तो स्लीपमध्ये झेलबाद होऊन माघारी परतला. सूत्रांच्या माहितीनुसार वीरेंद्र पंचांच्या निर्णयावर नाखूश होता. चेंडू त्याच्या बॅटला लागलाच नव्हता, तरीही पंचांना त्याला झेलबाद दिले. तो त्याच नाराजीत पेव्हेलियनला पोहोचला आणि तेथे त्याचं डोकं दिवाळावर आपटलं. त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.