वेस्ट इंडिजचा संघ घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे आणि शुक्रवारी धडकी भरवणारा प्रसंग मैदानावर घडला. १० मिनिटांच्या कालावधीत वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळले अन् त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. इतकेच नव्हे, तर अॅम्ब्यूलेन्स बोलावून त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. या खेळाडूंना नेमकं काय झालं? ते का अचानक कोसळले? याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही. दोन्ही खेळाडूंवर सध्या उपचार सुरू आहेत.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान महिला यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा सामना सुरू होता. पाकिस्तानी महिला संघाची फलंदाजी सुरू असताना वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू १० मिनिटांच्या अंतरानं चक्कर येऊन मैदानावर कोसळले. यापैकी एका खेळाडूचं नाव आलिया एलिन (Aaliyah Alleyne) असे आहे, तर दुसरीचं नाव चेडियन नेशन (Chedean Nation) असे आहे. या दोघींची प्रकृती एवढी चिंताजनक होती की त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.