नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने असणार आहेत. १२ वर्षानंतर प्रथमच भारतात ही मोठी स्पर्धा खेळवली जात आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी मुंबई आणि कोलकाता या शहरांची निवड केली गेली आहे, तर फायनल अहमदाबाद येथे होईल.
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांना आवाहन केले. "भारतासाठी अभिमानाचा क्षण असून आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे चौथ्यांदा आयोजन करणे हा एक मोठा सन्मान आहे. १२ शहरांमध्ये आम्ही आमची समृद्ध विविधता आणि जागतिक दर्जाच्या क्रिकेट पायाभूत सुविधांचे प्रदर्शन करू. एका अविस्मरणीय स्पर्धेसाठी सज्ज व्हा", असे जय शहा यांनी म्हटले.
ICC 2023 World Cup knockouts schedule -
- उपांत्य फेरी १ - मुंबई - १५ नोव्हेंबर.
- उपांत्य फेरी २ - कोलकाता - १६ नोव्हेंबर.
- अंतिम सामना - अहमदाबाद - १९ नोव्हेंबर.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू