Join us  

स्कॉटलंडच्या फलंदाजांची धु धु धुलाई; ट्वेंटी-20 विक्रमी भागीदारी, ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला

जॉर्ज मुन्सी आणि कायले गोएत्झर या कधीही न ऐकलेल्या नावांची आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चर्चा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 9:02 AM

Open in App

डुबलीन : जॉर्ज मुन्सी आणि कायले गोएत्झर या कधीही न ऐकलेल्या नावांची आता आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चर्चा आहे. या जोडीनं मंगळवारी असा पराक्रम करून दाखवला की टीम इंडियाच्या रोहित शर्मा-लोकेश राहुल, रोहित-शिखर धवन या जोडीलाही जमलेलं नाही. स्कॉटलंडच्या या सलामीवीरांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी तिसऱ्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. 23 धावांच्या फरकानं ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंच आणि डीजे शॉर्ट्स यांचा विक्रम वाचला. शिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघातही त्यांनी सहावे स्थान पटकावले. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला.

स्कॉटलंड आणि नेदरलँड्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यांत विक्रमांचा पाऊस पडला. प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने 3 बाद 252 धावा केल्या आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या नेदरलँड्सला 7 बाद 194 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही सहावी सर्वोत्तम खेळी ठरली.  स्कॉटलंड संघाने ऑस्ट्रेलियाचा ( 6/248 वि. इंग्लंड, 2019) विक्रम मोडला. भारताने 2017मध्ये श्रीलंकेविरुद्ध नोंदवलेला 5/260 धावांचा विक्रम थोडक्यात वाचला. या विक्रमात अफगाणिस्तान ( 3/278 वि. आयर्लंड, 2019) अव्वल स्थानावर आहेत.

मुन्सी आणि गोएत्झर यांनी पहिल्या विकेटसाठी 15.1 षटकांत 200 धावांची भागीदारी केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही पहिल्या विकेटसाठी तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे. अफगाणिस्तानच्या हझ्रतुल्लाह झाझई व उस्मान घानी यांनी आयर्लंडविरुद्ध 236 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा व लोकेश राहुल ( 165 वि. श्रीलंका, 2017) आणि रोहित व शिखर धवन ( 160 वि. आयर्लंड, 2018) हे अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानावर आहेत. 

मुन्सीनं 56 चेंडूंत 5 चौकार व 14 षटकारांची आतषबाजी करताना नाबाद 127 धावा केल्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार खेचण्याच्या विक्रमात मुन्सीनं दुसरे स्थान पटकावले आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही पाचवी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. गोएत्झरने 50 चेंडूंत 11 चौकार व 5 षटकारांसह 89 धावा केल्या. नेदरलँड्सच्या कर्णधार पिटर सीलरने 49 चेंडूंत 9 चौकार व 5 षटकारांसह 96 धावांची खेळी करताना कडवी झुंज दिली. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटआॅस्ट्रेलिया