जेक फ्रेझर मॅकगर्क आठवतोय का? हो तोच ज्यानं IPL च्या गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून 'एक से बढकर एक' खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या गड्याला आता ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. पण इथं मात्र त्याची सुरुवात खराब झालीये. पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याच्या पदरी भोपळा आलाय. ऑस्ट्रेलियन संघाच्या टॉप आर्डरमध्ये पदार्पणात शून्यावर होणारा दुसरा गडी आठवत नाही.
IPL मध्ये स्फोटक फलंदाजीसह सोडली होती छाप
आयपीएल २०२४ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ सातत्याने डेविड वॉर्नरला संघात स्थान देताना दिसले. पण तो सातत्याने अपयशी ठरत होता. त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या युवा क्रिकेटर जेक फ्रेझर मॅकगर्क याच्यावर डाव खेळला. त्यानेही धमाकेदार अंदाजात बॅटिंगचा नजराणा पेश करत अनेकांचे लक्षवेधून घेतले. ९ सामन्यात त्याने ४ अर्धशतकासह ३३० धावा केल्या होत्या.
अवघ्या तीन चेंडूत संपला डाव
२२ वर्षीय युवा बॅटरनं ऑस्ट्रेलियन क्रिकेटलाही प्रभावित केले. स्कॉटलंड विरुद्धच्या ३ टी-२० मालिकेसाठी त्याची संघात वर्णीही लागली. पहिल्या टी-२० सामन्यात ट्रॅविस हेडच्या साथीनं त्याने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. पण या पदार्पणाच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. ब्रँडन मॅकमुलेन याने दोन सामन्यात युवा बॅटरची परीक्षा घेत तिसऱ्या चेंडूवर त्याला झेलबाद केले.
माकडानं मोडलं होतो वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न
फार कमी क्रिकेट प्रेमींना माहिती असेल की, ऑस्ट्रेलियन युवा फलंदाजाची २०२० मध्ये अंडर १९ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियन संघात वर्णी लागली होती. पण दुर्देवाने तो या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू शकला नव्हता. त्यामागचं कारण होते एक माकड. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी या क्रिकेटरला माकडाने चावा घेतला होता. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगले होते.