भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नेहमीच कडवी स्पर्धा पाहायला मिळते. त्यामुळे भारताच्या क्रिकेटपटूबद्दल पाकिस्तानचे खेळाडू फारसे चांगले बोलत नाहीत. पण पाकिस्तानच्या एका माजी कर्णधाराने तर चक्क भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे कौतुक केले आहे. सचिन हा महान क्रिकेटपटू का होता, या गोष्टीचे चार मुद्दे त्यांनी मांडले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये दोन धावा खेळणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर आतापर्यंत १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर अजून बरेच विश्वविक्रम सचिनच्या नावावर आहेत. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०१३ साली निवृत्ती पत्करली होती. पण त्यानंतर आतापर्यंतही सचिनला कुणीही विसरू शकलेले नाही.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने सचिवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. इंझमाम यावेळी म्हणाला की, " सचिनकडे धावा करण्याची आणि विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता नक्कीच होती. पण सचिनसारखा विचार कोणी करू शकत नाही. एखादी खेळी कशी मोठी करायची किंवा कधी काय करायचे, हे सचिनला सर्वात चांगले माहिती होते."
इंझमाम पुढे म्हणाला की, " सचिन ज्या काळात खेळत होता, तेव्हा प्रत्येक धाव मोलाची होती. तेव्हा धावा नक्कीच स्वस्त नव्हत्या. त्या काळी महान क्रिकेटपटू ८-९ हजार धावांपर्यंत येऊन थांबायचे. भारताचे माजी महान सलामीवीर सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा दहा हजार धावा केल्या होत्या. पण त्यांचा विक्रमही सचिननेच मोडला. यावरून सचिन किती महान क्रिकेटपटू होता, हे तुम्हाला समजू शकते."
इंझमामने पुढे सांगितले की, " सचिन एकामागून एक विक्रम सर करत होता. पण कधीही त्याचे क्रिकेटवरून लक्ष विचलित झाले नाही. या गोष्टीला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे सचिनची मानसीक कणखरता. सचिनची मानसीक कणखरता एवढी प्रबळ होती की, सचिन नेहमीच चांगल्या विचारांनी क्रिकेट खेळायचा. त्याला कितीही डिवचले तरी त्याचे लक्ष विचलित व्हायचे नाही. त्याचबरोबर सचिनचा अजून एक वाखाडण्याजोगा गुण म्हणजे तो कोणत्याही गोलंदीजीला कधीच घाबरला नाही."