Join us  

इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना : कोहलीच्या सहभागाविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह

मालिका विजयाचा भारताचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 8:34 AM

Open in App

लंडन : भारतीय संघ लॉर्ड्सवर गुरुवारी इंग्लंडविरुद्ध दुसरा एकिदवसीय सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून आणखी एक मालिका जिंकण्याचा भारतीयांचा निर्धार असेल. दुसरीकडे, विराट कोहली स्नायूदुखींमुळे त्रस्त असल्याने त्याच्या खेळण्याविषयी शंका कायम आहे.

भारताला लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर ओव्हलवरील कामगिरीची पुनरावृत्तीची अपेक्षा आहे. बुमराह शानदार फॉर्ममध्ये असून मोहम्मद शमी प्रतिस्पर्धी फलंदाजीला खिंडार पाडू शकतो. श्रेयस अय्यर हा आखूड टप्प्याच्या चेंडूवर लवकर बाद होत असल्याने संघासाठी डोकेदुखी ठरतो. दीपक हुडासारखा क्षमतावान खेळाडू संघात स्थान मिळविण्याच्या प्रतीक्षेत असल्याने अय्यरवर दडपण असेल. ओव्हलवर रोहितने ५८ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या, तर शिखर धवनने लक्ष्य गाठण्यास मदत केली. त्यामुळे अन्य फलंदाजांना खेळपट्टी तपासण्याची संधीही मिळाली नव्हती. आत्मविश्वासाच्या जोरावर कर्णधार साहसी निर्णय घेऊ शकतो, हे रोहितने ओव्हलवर सिद्ध केले. 

ओव्हलच्या वेगवान माऱ्यास पोषक खेळपट्टीवर  जोस बटलर, ज्यो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो, जेसन रॉय व  लियाम लिव्हिंगस्टोन हे अपयशी ठरले होते. लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल मानली जाते. मात्र, भारतीय संघ फलंदाजी आणि गोलंदाजीत फॉर्ममध्ये असल्याने त्यांना विजयी आघाडी घेणे कठीण जाणार नाही. 

फलंदाजांवर अधिक जबाबदारी  यजमान इंग्लंडला मात्र फलंदाजीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे. टी-२० मालिकेनंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यातही त्यांचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरले होते. विशेष म्हणजे आघाडीच्या चारपैकी तीन फलंदाजांना भोपळाही फोडता न आल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी यजमान इंग्लंड संघाच्या फलंदाजांना या सामन्यामध्ये अधिक जबाबदारीने खेळावे लागेल. 

कोहलीची दुखापतखराब फॉर्ममध्ये असलेला कोहली दुखापतीमुळे पहिला सामना खेळू शकला नव्हता. कोहलीच्या खराब फॉर्मचा पहिल्या सामन्यावर कुठलाही परिणाम जाणवला नाही. टी-२० तील यशस्वी कामगिरीनंतर टीम इंडिया एकदिवसीय सामन्यातही दमदार कामगिरी करीत आहे. मंगळवारी भारताने पहिला सामना दहा गडी राखून सहज जिंकला होता.  कोहली दुसरा सामना खेळेल की नाही, याविषयी जसप्रीत बुमराहला विचारले तेव्हा त्याच्या दुखापतीबाबतची माहिती माझ्याकडे नसल्याचे सांगितले. कोहली शंभर टक्के फिट नसताना खेळण्याची घाई करीत असेल तर मांसपेशींचे दुखणे गंभीर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघइंग्लंड
Open in App