मुंबई : बीसीसीआयने आपली मनमानी अखेर कायमच ठेवल्याची एक गोष्ट सध्या घडली आहे. इंदूरमध्ये होणाऱ्या सामन्याच्या मोफत प्रवेशिका आपल्याला मिळणार नाहीत, हे समजल्यावर त्यांनी हा सामनाच हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना इंदूर येथे होणार होता. नवीन नियमावलीनुसार यजमान मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेला फक्त दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात येऊ शकतात. इंदूरच्या होळकर स्टेडियमची आसन क्षमता 27 हजार एवढी आहे. त्यानुसार 2700 जागा संघटनेला मिळणार होत्या.
मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेने यावर कोणताच आक्षेप घेतला नव्हता. पण त्यानंतर बीसीसीआयने काही मोफत प्रवेशिका संघटनेकडे मागवल्या होत्या. या वाढीव प्रवेशिका देण्यास संघटनेने नकार दिला होता. त्यामुळे आता बीसीसीआयने हा सामना इंदूरला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे.