पाल्लीकल : विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसºया वन डेत आज गुरुवारी श्रीलंकेवर पुन्हा एक विजय नोंदवून विजयाचा अश्वमेध दौडत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. कसोटी मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्विप’ करणा-या भारतीय संघाने पहिला वन डेदेखील नऊ गडी राखून सहज जिंकला होता.
शिखर धवनने नाबाद १३२ धावा ठोकून जे दडपण आणले त्यातून लंकेचे गोलंदाज सावरले नाहीत. लंकेचे गोलंदाज भारतीय संघाला आॅल आऊट करण्यात अपयशी ठरल्याने निवडकर्त्यांवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. कसोटी कर्णधार आणि सर्वांत आक्रमक फलंदाज दिनेश चंदीमल याला अंतिम एकादशमध्ये स्थान देण्यात आले नाही तर चंदीमल खेळतो त्या चौथ्या स्थानावर डावाला सुरुवात करणारा कर्णधार उपुल थरंगा स्वत: फलंदाजी करीत आहे.
कसोटी मालिकेदरम्यान पहिल्या आणि सातव्या स्थानावरील संघांमधील फरक स्पष्टपणे जाणवला. दाम्बुला येथे वन डेत तिसºया स्थानावरील भारत आणि आठव्या स्थानावरील लंका संघाच्या कामगिरीत किती तफावत आहे, हे दिसून
आले. लंकेला २०१९च्या विश्वचषकाची पात्रता मिळविण्यासाठी किमान दोन वन-डे जिंकावे लागतील. असे न झाल्यास ३० सप्टेंबरपर्यंतच्या मर्यादेत वेस्ट इंडिजच्या तुलनेत हा संघ मागे पडेल. त्यासाठी लंकेच्या फलंदाजांना जबाबदारीने खेळावे लागेल. या संघातील आघाडीचे फलंदाज धावा काढतात; पण मध्यम आणि तळाचे फलंदाज योगदान देत नाहीत, ही मुख्य समस्या आहे.
भारतीय फलंदाजी क्रमात कोहली बदल करतो का, हे पाहावे लागेल. लोकेश राहुल आणि केदार जाधव यांना संधी देण्यासाठी कोहली असे करू शकतो. या शिवाय अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल यांच्यासाठी विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
बेजबाबदार फटके मारू नका : थरंगा
पाहुण्या संघाला कडवे आव्हान द्यायचे झाल्यास बेजबाबदार फटके मारू नका, असा इशारा लंकेचा कर्णधार उपुल थरंगा याने सहकारी फलंदाजांना दिला. मोठ्या धावा उभारण्यासाठी पहिल्या चार फलंदाजांनी चांगली कामगिरी करावी. एखाद्या फलंदाजाने शतक ठोकल्यास आम्ही ३०० वर धावा उभारू शकतो. दुर्दैवाने पहिला सामना गमविला तरी मला सहकाºयांच्या क्षमतेवर विश्वास आहे. दुसºया वन डेत भरघोस कामगिरीद्वारे विजय मिळवू, असा विश्वास थरंगाने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केला.
लंका संघात ‘आॅल इज नॉट वेल’...
पहिल्या सामन्यानंतर कोच निक पोथास यांनी पत्रकारांपुढे कसोटी कर्णधार दिनेश चंदीमल याला बाहेर ठेवण्याबाबत रोष व्यक्त केला होता. लंकेची कामगिरी इतकी ढेपाळली, की याचे उत्तर मागण्यासाठी चाहत्यांनी चक्क खेळाडूंची बसदेखील रोखली.
संघ व्यवस्थापक असंका गुरुसिंघे यांची गरजेपेक्षा अधिक ढवळाढवळ वाढल्याचे संकेत पोथास यांनी दिले. मुख्य निवडकर्ता सनथ जयसूर्या आणि गुरुसिंघे यांच्या हस्तक्षेपाबद्दल यांनी ‘टू मेनी कूक्स’ असा शब्द उच्चारला.
उभय संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर.
श्रीलंका : उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, चामरा कापूगेदारा, मिलिंदा सिरिवर्धना, मलिंडा पुष्पकुमारा, अकीला धनंजया, लक्षण संदाकन, तिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चामीरा, विश्वा फर्नांडो.
सामना: दुपारी २.३० पासून स्थळ : पल्लीकल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम
Web Title: Second One Day today: India will be ready to win the win, to defeat Sri Lankan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.