नागपूर - भारताने श्रीलंकेविरुद्ध दुस-या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला. एक डाव आणि 239 धावांनी भारताने हा सामना जिंकला. श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 166 धावात संपुष्टात आला. कर्णधार चंडीमलचा (61) अपवाद वगळता श्रीलंकेचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कालच्या 1 बाद 11 वरुन श्रीलंकेने डाव पुढे सुरु केल्यानंतर ठराविक अंतराने श्रीलंकेचे फलंदाज बाद झाले. शंभर धावात श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. अखेरच्या षटकांमध्ये लकमलने थोडाफार प्रतिकार केला. त्याने नाबाद (31) धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सर्वाधिक चार गडी बाद केले. इशांत शर्मा, रविंद्र जाडेजा आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या सामन्यात अश्विनने 300 कसोटी बळींचा टप्पा गाठला तसेच या वर्षात त्याने आतापर्यंत 50 विकेट घेतल्या आहेत. ब-याच काळानंतर पुनरागमन करणा-या इशांत शर्मानेही आपली उपयुक्तता सिद्ध केली. फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दोन्ही डावात मिळून त्याने पाच विकेट घेतल्या. कसोटीचा आजचा चौथा दिवस होता. श्रीलंकेने कालच्या 1 बाद 21 वरुन आपला डाव पुढे सुरु केल्यानंतर करुणारत्नेच्या रुपाने श्रीलंकेला दिवसातला पहिला धक्का बसला. करुणारत्नेला (18) धावांवर जाडेजाने विजयकरवी झेलबाद केले. करुणारत्ने (18), थिरीमाने (23), मॅथ्यूज (10) आणि डिकवेला (4) स्वस्तात बाद झाले.
विराट कोहली (२१३ ) आणि रोहित (१०२) यांनी शतकी खेळी साकारुन शतकवीर मुरली विजय व चेतेश्वर पुजारा यांनी रचून दिलेल्या मोठ्या धावसंख्येच्या पायावर कळस चढविला आणि भारताने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेत विजयाची मजबूत पायाभरणी केली.
व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या दुस-या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळणा-या भारताने ६ बाद ६१० धावांवर डाव घोषित करत पहिल्या डावात ४०५ धावांची भक्कम आघाडी घेतली. तिस-या दिवसअखेर श्रीलंकेची दुस-या डावात १ बाद २१ धावा अशी अवस्था झाली होती. श्रीलंकेचा सलामीवीर समाराविक्रमाला भोपळाही फोडू न देता इशांत शर्माने क्लीनबोल्ड केले होते. रोहित शर्माने चार वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली.
चौथ्यांदा भारताच्या चार फलंदाजांनी एकाच डावात शतक ठोकले
- कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावताना कोहलीने सुनील गावसकर यांना मागे टाकले.
- चेतेश्वर पुजाराने सर्वांत कमी डावात तीन हजार कसोटी धावांचा टप्पा पार करताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने ५५ डावांमध्ये, तर पुजाराने ५३ डावांमध्ये ही कामगिरी केली.
- तब्बल ४ वर्षांनंतर रोहित शर्माने झळकावले शतक. याआधी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या कसोटी सामन्यात रोहितने शतकी खेळी केली होती.
- रोहितने तिसरे कसोटी शतक झळकावले.
- गेल्या ७ डावांमध्ये पाचव्यांदा मुरली विजय-चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी केली.
Web Title: Second push to Sri Lanka,
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.