ISPL 2nd Season : इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीग आपल्या दुसऱ्या हंगामाकडे कूच करत आहे. २६ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दुसऱ्या हंगामाचा थरार रंगेल. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील विविध ५५ शहरांमध्ये खेळाडूंच्या चाचण्या होणार आहेत. भारतातील पहिली-वहिली टेनिस बॉल टी-१० क्रिकेट स्पर्धा देशभरातील इच्छुक क्रिकेटपटूंना एक नवे व्यासपीठ देत आहे. ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे ते शिलेदार पाच स्पर्धात्मक झोनमध्ये विभागलेल्या ५५ शहरांमध्ये चाचण्यांसाठी नोंदणी करू शकतात.
५५ पैकी प्रत्येक शहरात झालेल्या चाचणी प्रक्रियेत सर्वोत्तम कामगिरी करणारे विभाग स्तरावर जातील. विभागीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणारे अव्वल खेळाडू लिलाव पूलमध्ये पोहोचतील. प्रत्येक झोनसाठी अंतिम चाचण्यांसाठी विशिष्ट तारखा आहेत. मध्य आणि दक्षिण विभाग २६ ते २८ ऑक्टोबर, पूर्व आणि उत्तर विभाग २ ते ४ नोव्हेंबर आणि पश्चिम विभाग ५ ते ९ नोव्हेंबर या काळात चाचण्या होणार आहेत. १२ आणि १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सिम्युलेशन सामने होतील. अर्थात खेळाडूंना याद्वारे आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. अधिक माहिती ISPL च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय क्रिकेटचा चेहरा, भारतरत्न सचिन तेंडुलकर ISPLच्या कोअर कमिटीचा सदस्य आहे. माध्यमांशी बोलताना सचिनने सांगितले की, ज्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली नसेल त्यांना ISPL हे एक व्यासपीठ आहे. या स्पर्धेने नवीन प्रेक्षकांसाठी खेळाचा आनंद आणला आहे आणि देशभरातील युवा क्रिकेटपटूंसाठी दरवाजे उघडले आहेत. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही एक संधी आहे असे समजा. मला आशा आहे की लीग सतत वाढत आहे आणि भारतीय क्रिकेटवर कायमस्वरूपी प्रभाव पाडत राहील, ज्यामुळे प्रत्येक खेळाडूला मोठे स्वप्न पाहण्याची संधी मिळेल.