इंदूर : नव्या वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेला ७ गड्यांनी सहज नमविले. या शानदार विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करणा-या लंकेला २० षटकांत ९ बाद १४२ धावांवर रोखल्यानंतर भारताने १७.३ षटकांत ३ बाद १४४ धावा केल्या. प्रमुख फलंदाजांना बाद करुन लंकेला हादरे दिलेला वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सामनावीर ठरला.होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपली छाप पाडली. शार्दुल ठाकूर (३/२३), सैनी (२/१८) आणि कुलदीप यादव (२/३८) यांच्या जोरावर भारताने लंकेला मर्यादित धावसंख्येत रोखले. यानंतर लोकेश राहुल (४५) आणि शिखर धवन (३२) यांनी ५५ चेंडूंत ७१ धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. राहुलने ३२ चेंडूंत ६ चौकारांसह ४५, तर धवनने यशस्वी पुनरागमन करताना २९ चेंडूंत २ चौकारांसह ३२ धावा केल्या. श्रेयस अय्यरने मधल्या फळीतील आपली जागा भक्कम करताना २६ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३४ धावा फटकावल्या. तसेच कर्णधार कोहलीने नाबाद राहताना १७ चेंडूंत एक चौकार व २ षटकारांसह ३० धावा कुटल्या.त्याआधी भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका विजयानंतर सोशल मीडियावर कोहलीने ‘तुला मानला रे ठाकूर’ अशी पोस्ट करत शार्दुल ठाकूरचे कौतुक केले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना शार्दुलने २३ धावांत ३ बळी मिळवले. तसेच नवदीप सैनी आणि चायनामन कुलदीप यादव यांनीही टिच्चून मारा केला. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षणाचा अपेक्षित निर्णय घेतला. मात्र दुखापतीतून सावरुन पुनरागमन करणा-या जसप्रीत बुमराहवर दानुष्का गुणथलिका व अविष्का फर्नांडो यांनी हल्ला चढवल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरले. दानुष्का-फर्नांडो यांनी लंकेला सावध परंतु भक्कम सुरुवात करुन दिली. मात्र फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने भारताला पहिले यश मिळवून देताना पाचव्या षटकात फर्नांडोला (२२) बाद केले.यानंतर सुरु झाला तो सैनी व यादव यांचा जलवा. दोघांनी ठराविक अंतराने लंकेला धक्के भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली. यष्टीरक्षक कुशल परेराने २८ चेंडूंत ३ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. आघाडीच्या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता लंकेकडून इतरांनी निराशा केली. सैनी व कुलदीप यांनी प्रमुख फलंदाजांना बाद केल्यानंतर शार्दुलने मधल्या फळीसह तळाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत पाहुण्यांना कमालीचे दडपणाखाली आणले.>संक्षिप्त धावफलक :श्रीलंका : २० षटकांत९ बाद १४२ धावा(कुशल परेरा ३४, अविष्का फर्नांडो २२, दानुष्का गुणाथिलका २०; शार्दुल ठाकूर ३/२३, नवदीप सैनी २/१८, कुलदीप यादव २/३८.) पराभूत वि. भारत : १७.३ षटकांत ३ बाद १४४ धावा (लोकेश राहुल ४५, श्रेयस अय्यर ३४, शिखर धवन ३२, विराट कोहली नाबाद ३०; वनिंदू हसरंगा २/३०, लाहिरु कुमारा १/३०.)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दुसरा टी २० सामना : भारताचा श्रीलंकेविरुद्ध ७ गड्यांनी विजय
दुसरा टी २० सामना : भारताचा श्रीलंकेविरुद्ध ७ गड्यांनी विजय
नव्या वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेला ७ गड्यांनी सहज नमविले.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 4:25 AM